मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज थोडीशी घट दिसून येत आहे. दिवसभरात राज्यात ५ हजार ५४४ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ लाख २० हजार ०५९ वर पोहोचली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ८५ मृत्यूंची नोंद झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, शनिवारच्या तुलनेत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडी घट झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात आज ५ हजार ५४४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज दिवसभरात एकूण ४ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी एकूण १६ लाख ८० हजार ९२६ रुग्ण बरे झालेले आहेत. याबरोबरच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यातील मृत्यूदर हा २.५९ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. याचबरोबर राज्यात ५ लाख २६ हजार ५५५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून एकूण ६ हजार ८१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०८,०४,४२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,२०,०५९ (१६.८५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवलादिवाळीनंतर दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याने महाराष्ट्रातही विशेष काळजी घेतली जात आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश राज्यातील ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंन्टेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात हा लॉकडाऊन असणार आहे.