सांगली : वय वर्षे ९२, एचआरसीटीचा स्कोअर १२, ऑक्सिजन पातळी ८८, त्यात मूत्रपिंडाला सूज... अशा गंभीर परिस्थितीतून वेळीच उपचार, दुर्दम्य इच्छाशक्ती, डाॅक्टरांचे प्रयत्न, कुटुंबाचा मानसिक आधार या जिवावर कर्नाटकातील मंगसुळी येथील बाळकृष्ण पाटील यांनी कोरोनाला चितपट केले व ते सोमवारी सुखरूपपणे घरी परतले.बाळकृष्ण पाटील यांना १३ दिवसांपूर्वी कोरोनाचे निदान झाले. आधीच त्यांच्या किडनीला सूज होती. त्यावर उपचार सुरू होते. त्यात कोरोना झाल्याने कुटुंबानेही धास्ती घेतली होती. पाटील यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रुग्णालयामार्फत सांगलीत सुरू केलेल्या न्यू लाईफ कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या सेंटरचे प्रमुख डाॅ. विक्रम कोळेकर यांनी त्यांच्यावर आयसीयुत उपचार सुरू केले. एचआरसीटी स्कोअर १२ होता, तर ऑक्सिजनची पातळी ८८ पर्यंत खाली आली होती. उपचारासाठी दाखल करतेवेळी त्यांना फारशी शुद्धही नव्हती. आधी त्यांची ऑक्सिजन पातळी पूर्ववत करण्यावर भर दिला. मूत्रपिंडाला सूज असल्याने तज्ज्ञ डाॅक्टरांचा टेलिफोनिक सल्ला घेण्यात आला.उपचारादरम्यान त्यांना रेमडेसिविरचे एकही इंजेक्शन देण्यात आले नाही. ते न देता त्यांनी कोरोनावर मात केल्याचे डाॅ. कोळेकर यांनी सांगितले. फॅमीफ्लूसह होमिओपॅथिक व ॲलोपॅथिक औषधे देण्यात आली. अशा गंभीर स्थितीतूनही अवघ्या तेरा दिवसात बाळकृष्ण पाटील यांनी रुग्णालयातून घर गाठले. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.यावेळी शिक्षक समितीचे राज्य नेते विश्वनाथ मिरजकर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहकारी रुग्णालयाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष अजित पाटील, कार्यकारी संचालक तुकाराम गायकवाड, राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड, पार्लमेंटरी बोर्डाचे सचिव शशिकांत भागवत उपस्थित होते.
CoronaVirus News: तब्बल ९२ व्या वर्षी केले कोरोनाला चितपट; रेमडेसिविरविनाच केली मात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 9:34 AM