- बाळासाहेब बोचरेमुंबई : ‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज’ अशी आळवणी करणाऱ्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेल्या लाखो वारकऱ्यांना यंदाही आषाढी वारी होईल की नाही? आणि पांडुरंगाची भेट होईल की नाही? हीच चिंता सतावत आहे. सरकारने अद्याप वारीबाबत निर्णय घेतला नसला तरी गतवर्षी ज्याप्रमाणे प्रतीकात्मक सोहळा करण्यात आला तशीच तयारी प्रशासन व पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने सुरू केली आहे.नियम व अटी घालून यंदा तरी आषाढी पायी वारीला परवानगी द्यावी, अशा भावना दिंडीकरी, फडकरी व वारकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. काहींनी आंदोलनाचीही तयारी केली आहे. आळंदी व देहू संस्थानकडे अनेक दिंडीकरी वारीसाठी आग्रही आहेत. पण सर्व काही सरकारच्या निर्णयावर अवलंबून असल्याने सध्या तरी प्रशासकीय पातळीवर गतवर्षाप्रमाणेच तयारी सुरू आहे.दर्शन ऑनलाइनच येत्या २० जुलै रोजी आषाढी यात्रा असून तत्पूर्वी १२ जुलैला पांडुरंगाचा पलंग विधी झाल्यानंतर २४ तास दर्शन सुरू केले जाते. सध्या मंदिर बंद असल्याने ऑनलाइन दर्शन चालू असून रात्री तेही बंद केले जाते. १२ जुलैपासून २४ तास ऑनलाइन दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे, असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. मंदिर उघडण्याची शासनाने परवानगी दिली तर पलंग विधीपासून २४ तास थेट दर्शन सुरू केले जाईल असे ते म्हणाले.परंपरेप्रमाणे मानाचे नैवेद्य, पादुका भेटी, मानाचे दिंडीकरी, फडकरी अशा १९५ मंडळींना दर्शन देणे ही तयारी करण्यात आली आहे. तसेच पांडुरंगाच्या रथालादेखील आणि प्रदक्षिणेलाही परवानगी देण्यात आली आहे, असे औसेकर महाराजांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांना निमंत्रणआषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्र्यांना या महापूजेसाठी निमंत्रण देण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
CoronaVirus News: आषाढी वारीवर यंदाही प्रश्नचिन्हच; प्रतीकात्मक वारीची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 10:17 AM