Video: ‘त्या’ ११ दिवसांनी खूप काही शिकवलं, मला ‘आत्मनिर्भर’ केलं- अशोक चव्हाण
By अतुल कुलकर्णी | Published: June 5, 2020 08:24 PM2020-06-05T20:24:08+5:302020-06-05T20:44:03+5:30
''खूप काळजी घेण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण वावरतो, राहतो त्याचा विचार केला पाहिजे. ज्या सूचना सरकार देत आहे त्याचे पालन केले पाहिजे हे मला क्षणोक्षणी जाणवले''
>> अतुल कुलकर्णी
मुंबई : मला कोरोनाची लागण झाल्याचे कळाले तेव्हा तो पहिला धक्का होता. घरात सगळे काळजीत होते. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात हे मी अनुभवले... हा विषय मी फार जवळून पाहिला. त्या ११ दिवसात स्वतःच स्वतःची सगळी कामे केली, तो सगळाच अनुभव वेगळ्या अर्थाने मला आत्मनिर्भर करून गेला... राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ‘लोकमत’शी बोलत होते.
खूप काळजी घेण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण वावरतो, राहतो त्याचा विचार केला पाहिजे. ज्या सूचना सरकार देत आहे त्याचे पालन केले पाहिजे हे मला क्षणोक्षणी जाणवले, अशी कबुलीही त्यांनी दिली. कोरोना मधून बरे झाल्यानंतर त्यांनी पहिली मुलाखत ‘लोकमत’ला दिली.
कोरोना संकटाच्या या काळात मी खूप फिरलो. मतदारसंघातही गेलो. मुंबईत अनेक बैठका घेतल्या. त्यावेळी आपल्याला अशी लागण होईल असे वाटले नव्हते. पण हजारात असा आहे की तो कसा तुमच्यापर्यंत येईल सांगता येत नाही काळजी घेतली होती पण आता त्यावर काय बोलणार असेही ते म्हणाले. कमीत कमी लोकांच्या थेट संपर्कात न येणे हीच या आजाराने मला दिलेली शिकवण आहे. याचा अर्थ काम करू नका असे होत नाही, पण कामाच्या पद्धती बदलाव्या लागतील असेही चव्हाण म्हणाले.
नांदेडमध्ये एकही रुग्ण नव्हता. त्यावेळी सगळे माझं अभिनंदन करायचे. पण मनात कायम धाकधूक असायची. लोकांचे कौतुक बरे वाटायचे, पण त्या वेळी मी त्यांना म्हणायचो, आज पर्यंत ठीक आहे, पुढे काय होईल माहिती नाही. नांदेडमध्ये स्थानिक लोकांमधून साथ आली नाही. गुरुद्वारामध्ये काही लोक बाहेरून आले, त्यामुळे साथ पुढे पसरली असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या आजारातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. मुंबईतील दाट लोकवस्तीत राहणार यांचे जीवनमान कसे उंचावता येईल, त्यांच्या राहणीमानात कसा फरक घडवून आणता येईल, याचा विचार करण्याची वेळ आणि बोध मला या आजाराने दिला आहे. मी नांदेडहुन येताना मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. मी व्यवस्था करतो आहे असा त्यांचा निरोप होता. मात्र काय झाले मला माहिती नाही. विमान देण्यास काय अडचण आली कल्पना नाही. मी ही त्याचा फार विचार केला नाही. शेवटी उशीर होऊ नये म्हणून मी ॲम्बुलन्समार्गे मुंबईत आलो, असेही चव्हाण यांनी त्यांना विमान न मिळाल्याच्या प्रश्नावर उत्तर दिले.
राज्याचे सार्वजनिक आणि वैद्यकीय शिक्षण विभाग ही व्यवस्था नव्याने सुधारली पाहिजे. यात खूप लक्ष घालण्याची गरज आहे हेदेखील या आजाराने मला शिकवले हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. विकासकामे होत राहतील, मात्र आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल असेही चव्हाण शेवटी म्हणाले.
आणखी वाचाः
मुंबई नाही आता या शहरात वाढतोय कोरोनाचा संसर्ग, तीन दिवसांत सापडले पाच हजार रुग्ण
औरंगाबादमध्ये कोरोनाचा ९४ वा बळी; आणखी सहा बाधितांची वाढ
आनंदवार्ता : बीडमध्ये कोरोनामुक्तीचे अर्धशतक; आणखी १० जणांना डिस्चार्ज
चिंताजनक! कोरोनाचा ग्रामीण भागातही फैलाव; काही राज्यांत शहरांपेक्षा गावात अधिक रुग्ण