मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,270 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,692 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढत आहे. अनेक नेते मंडळींना कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान आता भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण (Corona Virus) झाल्याची माहिती मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली. यासोबतच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील खबरदारी घेण्याची विनंती केली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचं म्हटलं आहे. "कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे आणि उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी" असं फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,270 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (5 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,270 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,24,692 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.