CoronaVirus News: राज्य कोरोना संकटात, तिजोरीवर मोठा भार; काँग्रेसनं घेतला महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:45 AM2021-04-29T11:45:02+5:302021-04-29T11:45:49+5:30
CoronaVirus News: बाळासाहेब थोरात १ वर्षाचं, तर काँग्रेसचे इतर सर्व आमदार एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार
मुंबई: राज्यात लवकरच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटाचं लसीकरण मोफत करण्यात येणार असल्याचा निर्णय कालच ठाकरे सरकारनं घेतला. या लसीकरणामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येणार आहे. आधीच लॉकडाऊनमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. कोरोना काळात आरोग्य सुविधांवर वाढलेला खर्च आणि लॉकडाऊनमुळे आटलेला महसूल अशा कात्रीत राज्य सरकार सापडलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
होय, माझी जबाबदारी! मंत्री जयंत पाटलांच्या मुलाकडून स्वत:सह ५ जणांच्या लसीचे पैसे CM फंडात
राज्यातील काँग्रेसचे सर्व आमदार त्यांचं एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'मोफत लसीकरण व्हावं ही पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भूमिका आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडेल. तो कमी व्हावा या हेतूनं राज्यातील काँग्रेसचे आमदार त्यांचं १ महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देतील,' असं थोरात म्हणाले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात त्यांचं एका वर्षाचं संपूर्ण वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार आहेत. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिली जाणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचंदेखील थोरात यांनी कौतुक केलं आहे. प्रतीक यांनी स्वत:च्या आणि इतर ५ जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतीक यांचा निर्णय कौतुकास्पद आहे, असं थोरात यांनी म्हटलं.