पिंपरी चिंचवड: राज्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागल्यानं बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून राजकारणदेखील तापलं आहे. गुजरातमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात रेमडेसिविरचा मोठा साठा आढळून आला. भाजपकडून रेमडेसिविरची साठेबाजी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला. यानंतर आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं रेमडेसिविर औषधासाठी संपर्क करा असं आवाहन करत भाजपच्या नेत्याचा नंबर सोशल मीडियावर शेअर केला आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसशी संबंधित एका कार्यकर्त्यानं पिंपरी चिंचवड शहरासाठीच्या फेसबुक पेजवर एक मोबाईल नंबर शेअर केला आहे. रेमडेसिविर औषध हवं असल्यास तात्काळ संपर्क साधा असं आवाहन या कार्यकर्त्यानं केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं शेअर केलेला मोबाईल नंबर पिंपरी चिंचवडचे भाजप नगरसेवक नामदेव ढाकेंचा आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं फेसबुक पोस्टमध्ये नंबर दिल्यामुळे गेल्या दोन दिवसांत ढाकेंना अनेकांनी फोन केले. नामदेव ढाके पिंपरी चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते आहेत. या प्रकरणी ढाकेंनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. औपचारिक तक्रार दाखल झाल्यास या प्रकरणात कारवाई करण्यात येईल, असं पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी ढाकेंनी तक्रार नोंदवण्यापूर्वी म्हटलं होतं. 'दोन दिवसांपूर्वी मला रेमडेसिविर औषधासाठी अचानक फोन येऊ लागले. कोरोना रुग्णांचे नातेवाईक माझ्याशी संपर्क साधत होते. या प्रकरणी खोलात जाण्याचा प्रयत्न केल्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या फेसबुक पोस्टमध्ये माझा नंबर देण्यात आल्याची बाब मला समजली. मला त्रास देण्यासाठी मुद्दामहून हा प्रकार करण्यात आला,' असं ढाके म्हणाले.राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं ढाकेंचा नंबर आपणच फेसबुकवर पोस्ट केल्याचं म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. माझ्याकडे रेमडेसिविरचे १,१०० डोस उपलब्ध असल्याचा दावा ढाकेंनी केला होता, असं राष्ट्रवादी युथ विंगचे शहर अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी सांगितलं. रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्यानं एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचं मला समजलं. त्यामुळे लोकांचा त्रास कमी व्हावा, त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळावं यासाठी मी ढाकेंचा नंबर फेसबुकवर शेअर केला. ढाके सभागृहाचे नेते आहेत. त्यामुळे ही त्यांची जबाबदारी आहे, असं वाकडकर म्हणाले.
CoronaVirus News: रेमडेसिविरसाठी संपर्क साधा...; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं थेट भाजप नेत्याचा नंबरच शेअर केला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 8:17 AM