मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात असून कोट्यवधी भारतीय जीव मुठीत धरूनच जगत आहेत. त्यामुळे आरोग्य विमा काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असली तरी आयुर्विमा काढण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट होताना दिसत आहे. मे, २०१९ आणि २०२० या दोन महिन्यांची तुलना केल्यास हा विमा काढणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ३८ टक्क्यांनी घटले आहे.गेल्या वर्षी १६,२५,२१४ पॉलिसी काढण्यात आल्या होत्या. यंदा ते प्रमाण १०,०८,१७३ इतके कमी झाले आहे. विमा कंपन्यांच्या तिजोरीत ्रप्रीमियमच्या माध्यमातून १८ हजार ४१४ कोटी रुपये जमा झाले होते. गेल्या महिन्यातील ती रक्कम १३ हजार ७३९ कोटी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ या सरकारी आणि अन्य २३ खासगी कंपन्या विमा क्षेत्रात कार्यरत आहेत. इश्युरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडे (आयआरडीएआय) त्यांच्या व्यवसायाबाबतची माहिती संकलित केली जाते. तिथल्या नोंदींच्या आधारे ही माहिती हाती आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात विमा संरक्षण असलेल्या विमाधारकांची संख्या १ कोटी ४३ लाख होती. तर, विम्याच्या माध्यमातून मिळणारी रक्कम (सम अॅश्युअर्ड) ३ लाख १० हजार ८६० कोटी होती. यंदा विमा धारकांची संख्या ५० लाख ७१ हजारांवर आली असून सम अॅश्युअर्डची रक्कम १ लाख ३७ हजार ५६५ कोटी इतकी कमी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातल्या एप्रिल, मे महिन्याची तुलना यंदाच्या महिन्यांशी केली असता प्रीमियमची रक्कम २७.९२ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर, पॉलिसीधारकांची संख्या (५१.३२), पॉलिसीचे संरक्षण असलेले (५७.६२) आणि सम अॅश्युअर्डच्या रकमेत (२०.२३) लक्षणीय घट झाली आहे.कोरोना संकटामुळे प्रत्येकाची आर्थिक घडी बिघडली आहे. आयुर्विमा काढण्यापेक्षा सध्या आरोग्य काढण्याची निकड प्रत्येकालाच वाटू लागली आहे. त्यामुळे आयुर्विमा काढण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. विमा क्षेत्रात २३ खासगी कंपनी सक्रिय असल्या तरी भारतीय आयुर्विमा महामंडळाचा वाटा त्यात आजही सर्वाधिक आहे.
CoronaVirus News : विमा कंपन्यांनाही कोरोनाचा फटका, आर्थिक घडी बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 2:02 AM