मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाबाबत निर्बंध शिथिल केल्यामुळे आता यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्ण व मृत्युसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यात लवकरच सेरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात घेण्यात येणाऱ्या सेरो सर्वेक्षणात ३६ जिल्ह्यांतील संसर्गाची स्थिती अभ्यासण्यात येईल, याविषयी वैद्यकीय तज्ज्ञांशीही चर्चा करण्यात येणार आहे. याखेरीज पालिका - जिल्हा पातळीवर स्थानिक प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत पुणे, मुंबई आणि नागपूर येथे सेरो सर्वेक्षण पार पडले आहे. केरळ राज्यात नुकतेच राज्यस्तरीय सेरो सर्वेक्षण पार पडले. त्या विविध वयोगटातील व्यक्तींमध्ये अधिक प्रतिपिंडाची क्षमता असल्याचे आढळून आले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही हे सर्वेक्षण घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.या सेरो सर्वेक्षणाकरिता जिल्हा पातळीवरून मोठ्या प्रमाणात नमुने घेण्यात येतील. या सर्वेक्षणातून डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रतिपिंडाची निर्मिती झाली का हेसुद्धा पडताळण्यास मदत होईल. याबाबत कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, कोरोनाविषयक निर्बंध शिथिल करूनही अजूनही संसर्ग नियंत्रणात आहे. यामागील नेमके कारण अभ्यासण्याची गरज आहे. सेरो सर्वेक्षणाप्रमाणेच जिनोम सिक्वेन्सिंगही आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले....असे केले जाते सेरो सर्वेक्षणहे सर्वेक्षण १२ वयोगटावरील व्यक्तींमध्ये करण्यात येते.झोपडपट्टी, दाटीवाटीच्या वस्त्या आणि इतर विभागांमधून दहा हजार नमुने गोळा केले जात आहेत. या नमुन्यांमधून प्रतिपिंडाचे निदान केले जाईल.किती जणांच्या शरीरात कोरोना ॲन्टिबॉडीज तयार झाल्या आहेत हे तपासले जाईल.प्रतिपिंडाच्या निदानावरून कोविड संसर्ग संक्रमणाचा कल समजून घेता येईल.
CoronaVirus News: सेरो सर्वेक्षणातून आरोग्य विभाग करणार राज्यातील कोरोना संसर्गाचा अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 7:45 AM