- सुमेध वाघमारे नागपूर : ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’हा वेगाने पसरत असल्याने केंद्र सरकारने ‘विषाणूचा चिंताजनक प्रकार’ घोषित केले आहे. परंतु राज्यात आढळून येत असलेले याचे रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा विचार केला असता या विषाणूचा प्रकाराबाबतचा अंदाज खोट ठरला का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तज्ज्ञाच्या मते, या विषाणूचा आणखी अभ्यास होणे गरजेचे आहे.कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताच आता डेल्टा प्लस कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचे कारण ‘डेल्टा प्लस व्हेरिएन्ट’ असण्याची शक्यता बोलली जात आहे. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’ रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण हे मुंबई ७, पुणे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी १ रुग्ण आहे. विशेष म्हणजे, या सर्व रुग्णांचा अहवाल एक महिन्यानंतर आता प्राप्त झाला आहे. बहुसंख्य रुग्ण ठणठणीत झाले आहेत. यामुळे विषाणूच्या या प्रकाराबाबत चिंतेचे कारण नसल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. विदर्भातील चारही रुग्णांकडून संसर्ग नाही विदर्भात आढळून आलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या चारही रुग्णांकडून संसर्ग झाला नसल्याचे समोर आले आहे. तिन्ही रुग्णांनी घरीच राहून उपचार घेतला. हे तिन्ही रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णालयात दाखल रुग्ण उपचारानंतरच बरा झाला.‘डेल्टा’च्या तुलनेत ‘डेल्टा प्लस’ हा कमी धोकादायक आहे. तसा ‘डाटा’ ‘आयसीएमआर’कडे उपलब्ध आहे. आतापर्यंत जे रुग्ण ‘डेल्टा प्लस’ने बाधित झाले त्यांच्याकडील माहितीवरून ‘डेल्टा’पेक्षा हा कमी संसर्गाचा असल्याचे पुढे आले आहे.यावर लसीकरणासोबतच ‘जिनोम सिक्वेसिंग’ करीत अभ्यास सुरू ठेवणे हाच उपाय आहे. - डॉ. नितीन शिंदे, संसर्गजन्य आजारतज्ज्ञ
CoronaVirus News: तिसऱ्या लाटेची भीती असताना राज्याला दिलासा; डेल्टा प्लसचा 'तो' अंदाज खोटा ठरला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 10:09 AM