मुंबई- महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रावर निशाणा साधल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी मांडलेल्या एक एक मुद्द्यांची अक्षरशः चिरफाड केली आहे. पत्रकार परिषद घेत फडणवीस म्हणाले, पीपीई किट्स मिळाले नाही म्हणून सांगतात, पण यासंदर्भातला डायनामिक डॅशबोर्ड आहे, त्या डॅशबोर्डवर पीपीई किट्स कुठल्या राज्याला देण्यात आले याबाबतची माहिती देण्यात आलेली असते. २६ मेपर्यंत महाराष्ट्राला ९ लाख ८८ हजार म्हणजे जवळजवळ १० लाख पीपीई किट्स दिल्या आहेत. तसेच १६ लाख एन ९५ मास्क दिले आहेत. ४६८ कोटी रुपये हे केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिलेले आहेत, असंही फडणवीसांनी सांगितलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात उत्तम काम झालेलं सांगत असलेल्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही फडणवीसांनी खडे बोल सुनावले आहेत. मुंबईत टेस्टची संख्या कमी करण्यात आली आहे. देशात टेस्ट केल्यानंतर एकूण पाच टक्के रुग्ण पॉझिटिव्ह निघतात आणि महाराष्ट्रात ते १३ ते साडेतेरा टक्के पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात. मे महिन्यात त्याचं प्रमाण ३२ टक्के करण्यात आलं आहे. मग कशाच्या आधारावर आपली पाठ थोपटण्याचं काम ठाकरे सरकारच्या वतीनं चाललं आहे. हे मला खरोखरंच समजत नाही, असं म्हणत फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं आहे.
केंद्राकडून पैसे मिळालेले असतानाही केंद्राकडून काही येत नाही असं सांगू नका. केंद्र सरकारकडून जीएसटीचे पैसे नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंत पूर्ण आलेले आहेत. डिसेंबर ते मार्चपर्यंतच्या पैशांचा निर्णय जीएसटी काऊन्सिल घेते आहे. त्यामुळे खोट बोल पण रेटून बोल असा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आहे. अशा प्रकारच्या एकत्रित पत्रकार परिषदा घेण्याऐवजी मुंबईत लोकांना अँब्युलन्स न मिळाल्यामुळे लोकांचा मृत्यू होतोय, त्यासंदर्भात तुम्ही काय करणार आहात ते सांगा, असं आव्हानंच देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना दिलं आहे. मुंबईत लोकांचं टेस्टिंग होत नाही, यासंदर्भात काय करणार आहोत ते सांगा. केवळ फेकाफेक करायची आणि खोटी आकडेवारी द्यायची यानं महाराष्ट्राचं भलं होणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांचा मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्टपणे माहीत आहे. सरकारला मदत करायची आजही आमची भूमिका आहे. पण अशा प्रकारे सरकारकडून फेकाफेक केली जात असेल, तर त्याचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल, असंही फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना स्थलांतरित मजुरांच्या जागी स्थान मिळाल्यास मला आनंदच, मी त्याचं स्वागत केलेलं आहे. त्यासाठी तरुणांना ते कौशल्यही द्यावं लागेल. डायमंड इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात बंगालचा कामगार काम करतो. तो जर निघून गेला तर महाराष्ट्रातील कुठल्या कामगाराला ते कौशल्य लगेच आत्मसाद करता येणार आहे. ते कौशल्य त्याला आधी शिकावं लागेल. देशातील ३३ टक्के रुग्ण ज्या राज्यात आहेत. देशातील ४० टक्के मृत्यू ज्या राज्यात झालेले आहेत. त्या राज्याचे मंत्री आपली पाठ थोपटून घेत आम्ही कसं उत्तम काम करतोय हे सांगत असल्याची टीकाही फडणवीसांनी केली आहे.
हेही वाचा
CoronaVirus News: विरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
CoronaVirus News :मोदींच्या भारताकडे कोणी डोळे वटारून पाहू शकत नाही, भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा
भारत-चीन तणाव वाढला! युद्धाच्या तयारीला वेग द्या; शी जिनपिंग यांचे सेनेला आदेश
बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात, पवार फडणवीसांवर भडकले