- विशाल शिर्केपिंपरी : कोरोना काळात राज्यातील शेतकऱ्यांनी पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रामार्फत तब्बल २७ हजार ६०६ टन फळे आणि भाजीपाल्याची निर्यात केली आहे. यातून सुमारे ३४५ कोटी ७ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.कृषी मालाची निर्यात करण्यासाठी राज्यात ४४ निर्यात सुविधा केंद्रांची निर्मिती करण्यात आली. यात प्रीकुलिंग, शीतगृह, रायपनिंग चेंबर, पॅकहाऊस, विशेष प्रक्रिया सुविधा, विकिरण प्रक्रिया, व्हेपर हीट ट्रीटमेंट अशा सुविधांचा यात समावेश आहे. या सुविधांचा वापर करून आंबा, द्राक्ष, केळी, डाळिंब, कांदा, वांगी, भाजीपाला, हिरवी मिरची, तसेच मसाल्याचे पदार्थ, आटा असा कृषी प्रक्रिया केलेला मालही निर्यात करण्यात येत आहे. कोरोना काळात या सुविधेच्या माध्यमातून एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत २७ हजार ६०६ टन शेतमाल निर्यात करण्यात आला. त्या माध्यमातून ३४५ कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. आंतरराष्ट्रीय निकष पाळून भाजीपाला व फळे निर्यात केली जात आहेत. व्हेपर हीट ट्रीटमेंट सुविधेमुळे किडमुक्त आंबा निर्यात करणे शक्य झाले आहे. त्यामुळे युरोपियन समुदाय, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाची बाजारपेठ आपल्यासाठी खुली झाली आहे. विकिरण सुविधेच्या वापरामुळे कृषी मालाची निर्यात वाढली. कांदा, मसाल्याचे पदार्थ, पशुखाद्य, सुकामेवा, आटा, मैदा असे कृषी प्रक्रिया केलेले पदार्थही पाठविणे शक्य झाल्याची माहिती पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.पॅकेजिंग, तंत्रज्ञानामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमावला विश्वासपणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रामार्फत निर्यात होणा-या मालाची गुणवत्ता टिकवून ठेवली जाते. उत्कृष्ट पॅकेजिंग, विकिरण, व्हेपर हीट ट्रीटमेंट, शेतमालाची वैज्ञानिकदृष्ट्या हाताळणी यामुळे मालाची गुणवत्ता टिकून राहते. ॲग्रीकल्चर अँड प्रोसेस फूड प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटीच्या (अपेडा) संगणक प्रणालीमध्ये नोंदणीकृत मालच प्रक्रिया करून निर्यात केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ग्राहकांचा विश्वास वाढण्यास मदत झाली.
CoronaVirus News: कोरोना काळात फळे, भाजीपाल्याने दिला हात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 2:58 AM