- यदु जोशीमुंबई : नऊ वर्षांच्या देविकाच्या वडिलांचा कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यू झाला. या धक्क्याने तिच्या आईने आत्महत्या केली. निराधार झालेल्या देविकाला पुणे जिल्ह्यातील मावळच्या बालगृहात दाखल करण्यात आले. आईच्या मायेने बालगृहातील कर्मचारी आता तिचा सांभाळ करीत आहेत.महिला व बालविकास विभागाच्या राज्यभरातील बालगृहांमध्ये सध्या कोरोनाने आई-वडिलांचे छत्र हरपलेली बालके दाखल होत आहेत. आभाळच फाटलेल्या या निरागस बालकांना हक्काचे छत मिळाले आहे. १८ एप्रिल २०२१ रोजी नाशिकच्या रेल्वेस्थानकात एक व्यक्ती दोन वर्षांच्या बालिकेसह बसलेली रेल्वे पोलिसांनी बघितली. त्यांनी चाइल्ड लाइनशी संपर्क केला, तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना कल्पना दिली. दोन वर्षांच्या त्या बालिकेचे वडील कुठे आहेत याची माहिती नाही, तिची आई टीबी अन् कोरोनावरील उपचारात दगावली. पोलीस, चाइल्ड लाइनच्या माध्यमातून तिला बालगृहात दाखल केले गेले. ‘आचल’ला मायेचा पदर मिळाला.नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एका गावात साधारण १४, १५, १६ वयाची अशी तीन भावंडं.. चंचल, रूपल, अक्षय.. गेल्या वर्षी कोरोनाने आई गेली, त्या दु:खातून कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करीत असताना एप्रिल २०२१ मध्ये ताप आला आणि पुढचे उपचार होण्याआधी वडिलांवरही काळाने घाला घातला. तातडीची मदत म्हणून या मुलांना जिल्हा बालसंरक्षण कक्षाने प्रथम अन्नधान्य देऊ केले. हलाखीची परिस्थिती, तसेच २ मुलींची सुरक्षितता यामुळे आत्या, काका यांनी संगोपनास स्पष्ट नकार दिला. या मुलांना बालगृहात दाखल करण्यात आले. साधारण कळत्या वयाच्या या मुलांच्या मनावर मोठा आघात झाला असल्याने त्यांचे समुपदेशन करण्यात आले. आता आम्ही इथे राहू, शिक्षण पूर्ण करू असे सांगत या मुलांनी इयत्ता दहावी, बारावीचा अभ्यास सुरू ठेवला आहे.पुण्याच्या हवेली तालुक्यातील कविता (१०), सानिका (१३) या मुलींच्या आईचे चार वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. वडील डॉक्टर. कोरोच्या पहिल्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला. या मुली कोरोना पॉझिटिव्ह होत्या, त्यांचे उपचार पूर्ण झाल्यावर दोन्ही बहिणींना महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या बालगृहात दाखल करण्यात आले. बालगृहात दाखल झाल्यानंतर इयत्ता पाचवी आणि आठवी उत्तीर्ण होत या मुली पुढच्या इयत्तेत गेल्या आहेत. चित्रकलेत दोघींना विशेष रस आहे. बालगृहात त्यांची ही कला जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.पालक दगावल्याने जळगावला बालगृहात दाखल करतानाच १४ वर्षे वयाच्या मूकबधिर मुलाचा हात फ्रॅक्चर होता. उपचारानंतर पुन्हा बालकाला बालगृहात आणण्यात आले. (बालकांची नावे बदलली आहेत.)दु:खी झालेल्या आनंदीला आश्रयबुलडाण्याच्या आनंदीची दैव घेत असलेली परीक्षा दुर्दैवी आहे. ती वर्षाची असताना ओडिशामध्ये वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. तिच्यासह आई मुंबईला आजी-आजोबांकडे आले. नंतर कुटुंब बुलडाण्याला स्थायिक झालं. २०१९ मध्ये शिपिंग कंपनीत नोकरी मिळाल्याने आईने तिला आजी-आजोबांकडे ठेवले. डिसेंबर २०२० मधे तिच्या आईचा कोरोनाने मृत्यू झाला. आनंदी १२, आजोबा ७३ वर्षांचे, तर आजी ६२ वर्षांची. आजी पतसंस्थेत एजंट आहे. आता राज्य सरकार अनाथांसाठी आणत असलेल्या योजनेत सामावून घेत या मुलीला, वृद्ध आजी-आजोबांना आधार मिळणार आहे.
CoronaVirus News: कोरोनामुळे अनाथ झालेल्या लेकरांच्या डोक्यावर सरकारी छत!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 9:12 AM