मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्यात येणार आहे.मास्क आणि सॅनिटायजरचा समावेश जीवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले. मास्क व सॅनिटायजरच्या किंमती नियंत्रणात आणण्याबाबत आरोग्यमंत्री टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित होते.टोपे यावेळी म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायजरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे या दोन्ही वस्तूंची मागणी वाढली आहे. सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत मास्क आणि सॅनिटायजर उपलब्ध व्हावे यासाठी त्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मास्क आणि सॅनिटायजरच्या किमती नियंत्रणात आणता येतील का याबाबत केंद्र शासनाचा कायदा तपासून विधी व न्याय विभागाने अभिप्राय तात्काळ द्यावेत, अशी सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी केली.मात्र या समितीत कोण असेल? ही समिती किती दिवसात त्यांचा अहवाल देईल? आलेला अहवाल सरकार मान्य करेल का? या कोणत्याही मुद्द्यावर टोपे यांनी कसलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. कोरोनाच्या चाचण्या खाजगी रुग्णालयात कमी दराने होतील असे ठरवताना सरकारने कोणतीही समिती स्थापन केली नव्हती. खाजगी रुग्णवाहिन्याचे दर निश्चित करतानाही कोणती समिती नव्हती. हे दोन्ही निर्णय आरोग्यमंत्र्यांनी स्वत: घेतले होते.
CoronaVirus News : मास्क, सॅनिटायजर दरनिश्चितीस सरकार समिती गठित करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 2:14 AM