जळगाव: कोरोनाचा वाढता प्रसार चिंताजनक असल्याने त्याचा आढावा घेण्यासाठी आलेले राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच स्वत: विना मास्क बुधवारी सकाळी साडे दहा वाजता अजिंठा विश्रामगृहावर दाखल झाले. यावेळी तेथे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आमदार, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचारी यांची संख्या शेकडोने होती. आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थित सोशल डिस्टंन्सिगची ऐसीतैसी झाली होती.
तोंडाला मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सिगची न पाळणाऱ्यांविरुध्द एकीकडे सामान्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, तर दुसरीकडे आरोग्यमंत्री, पालकमंत्री विनामास्क व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितच मंत्र्यांच्या भोवती प्रचंड गराडा होता. यावेळी काहींना मास्क लावला होता, तर काहींनी त्याची काळजीच घेतली नाही.
आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांकडून सॅनिटायझर पुरविले जात होते, त्याशिवाय थर्मोमीटरने शरीरातील तापमान मोजले जात होते. मात्र मास्क व सोशल डिस्टन्सिग याकडे कोणीच लक्ष दिले नाही. आरोग्य मंत्री टोपे यांचे १०.३० वाजता विश्रामगृहावर दाखल झाले तर ११.१० वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. म्हणजे ४० मिनिटे विश्रामगृहावर सोशल डिस्टन्सिगची ऐसीतैसी झाली, तीही आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत.
आमदारांना ओळखत नाहीत तर कोणाला ओळखतात
विश्रामगृहावर दालनात अनावश्यक लोकांना प्रवेश देऊ नये अशा सूचना असल्याने रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल बडगुजर आतमध्ये कोणालाच सोडत नव्हते. ज्यांच्याकडे पास आहे, त्यांनाच प्रवेश आहे असे ते सांगत असतानाच त्यावेळी माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी व आमदार चंदूलाल पटेल आले. तोंडाला मास्क असल्याने बडगुजर यांनी त्यांना ओळखले नाही. त्यामुळे त्यांना अडविण्यात आले. त्यावर डॉ.जगवाणी यांनी जळगावात ड्युटी करतात, आमदारांना ओळखत नाहीत तर कोणाला ओळखतात अशा शब्दात अनिल बडगुजर यांना सुनावले.