मुंबई : राज्यात कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारस किंवा जवळच्या नातेवाइकांना ५० हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानासाठी २० हजार जण पात्र ठरले असून, यांच्या अनुदानासाठी राज्य सरकारने १०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यासाठी शासन स्तरावर संकेतस्थळ सुरू करणे, बँक खाते उघडण्यासह आवश्यक कार्यवाही संदर्भातील शासन निर्णय महसूल विभागाने जारी केला आहे. त्यामुळे लवकरच कोविड मृतांच्या पात्र नातेवाइकांना अनुदान वितरित करण्याचे काम सुरू होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशातील कोरोना मृतांच्या नातेवाइकांना ५० हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय झाला. मात्र, कोविड मृतांची संख्या मोठी असल्याने पडणारा आर्थिक भार लक्षात घेत अनेक राज्यात हे काम संथगतीने सुरू होते. मात्र, न्यायालयाने कडक भूमिका घेत सर्व राज्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ही मदत केली जाणार आहे. यासाठी नवी वेबसाईट देखील विकसित करण्यात येणार असल्याची घोषणाही राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती. तसेच अनुदान वितरणाची पद्धतही ठरविण्यात आली. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात येणाऱ्या २० हजार पात्र अर्जदारांसाठी शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. नवे वेब पोर्टल सुरूअनुदानासाठी मंजूर केलेली ही सर्व रक्कम आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांच्या नावे उघडण्यात आलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित पात्र अर्जदारांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नव्याने वेब पोर्टलदेखील सुरू करण्यात आले असून त्या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज कसा करावा तसेच या योजनेची संपूर्ण तपशीलवार कार्यपद्धती याची माहिती देण्यात आली होती.
CoronaVirus News: कोरोना मृतांच्या नातेवाईकांना अनुदानासाठी शंभर कोटी; खात्यात लवकरच जमा होणार रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 7:40 AM