अहमदनगर/नांदेड : राज्यात कोरोनाचा कहर वाढला असून, मृत्यूचे तांडव सुरू आहे. स्मशानभूमीही कमी पडू लागल्या असून, सामूहिक अंत्यसंस्कार किंवा प्रतीक्षा याशिवाय पर्याय नसल्याचे विदारक चित्र अहमदनगर आणि नांदेड येथे पाहायला मिळाले. नगर येथील स्मशानभूमीत तब्बल ४५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नांदेडमध्ये २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले, तर १३ मृतदेहांना अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागल्याने स्मशानभूमीही गहिवरल्याचे चित्र पाहायला मिळाले. अहमदनगरमध्ये गुरुवारी दिवसभरात ४५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे सर्वजण कोरोनामुळेच दगावले. पहाटेपर्यंत अंत्यविधी सुरू होते. वर्षभरातील सर्वाधिक मृत्यू एका दिवसात झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बुधवारी १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा आकडा गुरुवारी एकदम वाढला. दिवसभरात अमरधामध्ये ४२ तर दफनभूमीमध्ये ३ आशा ४५ जणांवर अंत्यविधी करण्यात आला. २२ मृतदेह ओट्यांवर ठेवून अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कार सहायक मंडळाने लाकूड व गोवऱ्यांची व्यवस्था केली. महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराचे चार कर्मचारी हे काम अहोरात्र करत आहेत. एका शववाहिकेतून ५ ते ६ मृतदेहांची वाहतूकजिल्हा शासकीय रुग्णालयातून मतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम येथील स्मशानभूमीत आणण्यासाठी एकच शववाहिका आहे. साधारणपणे एका खेपेत ५ ते ६ मृतदेह जिल्हा रुग्णालयातून अमरधाम येथे आणले जातात. मनपाने आणखी एक शववाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन वर्ष उलटले, तरी अद्याप त्यास मुहूर्त मिळालेला नाही.स्मशानभूमीची दारे बंद कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या एकीकडे वाढत असताना धुळे जिल्ह्यातील साक्री येथे मात्र स्मशानभूमींची दारे बंद झाली आहेत. शहरातील स्मशानभूमीच्या गेटला कुलूप ठोकण्यात आले आहे. अंत्यसंस्कारासाठी नगरपंचायतची परवानगी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा फलक लावण्यात आला आहे.नांदेड : सहा तासांत २३ जणांवर अंत्यसंस्कार, १३ मृतदेह प्रतीक्षेतनांदेड महानगरपालिकेच्या वतीने गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. शुक्रवारी सकाळी ८ ते २ या वेळेत तब्बल २३ मृतदेहांवर महापालिकेच्या पथकाने अंत्यसंस्कार केले, तर आणखी १३ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी शांतीधाम परिसरात वेटिंगवर असल्याचे चित्र होते. शुक्रवारी शांतीधाम परिसरात अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाच्या रांगा लागल्या होत्या. एकाच वेळी अनेक मृतदेहांना अग्नी दिल्याने या परिसरात धुराचा लोट उठला होता. त्यातच अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मोजक्या नातेवाइकांच्या आक्रोश आणि मृतदेह घेऊन येणाऱ्या सायरनच्या अस्वस्थ करणाऱ्या आवाजाने शांतीधाम परिसरातील वातावरण मन बधिर करून टाकणारे होते.
CoronaVirus News: मृतदेह बघून स्मशानही गहिवरले; अंत्यविधीसाठीही वेटिंग लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 3:08 AM