- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भारताने सोमवारी ११ कोटी चाचण्या पार करून आणि कोराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.६८ टक्के गाठून दोन मैलाचे दगड रोवले. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण आतापर्यंतचे सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ८९.९ टक्के असले तरी सतत येत असलेले नवे रुग्ण काळजीचा विषय आहे. महाराष्ट्रात रविवारी चाचण्या ५७ हजार ५०० झाल्या. त्या ३० ऑक्टोबर रोजी ७० हजार होत्या. महाराष्ट्रात रुग्ण सकारात्मक येण्याचे प्रमाण १८.७ टक्के आहे तर देशात हे प्रमाण एक नोव्हेंबर रोजी ७.४ टक्के होते. भारतात सर्वात जास्त रुग्ण बरे झाल्यामुळे जगात भारत वरच्या स्थानी कायम आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सोमवारी ७५ लाख ४४ हजार ७९८ होती. देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार ३२१ एवढे कमी कोरोना रुग्ण आढळले. सक्रिय रुग्णांची संख्याही घसरतच चालली आहे. भारतात सक्रिय रुग्ण ५ लाख ६१ हजार ९०८ आहेत.
उपचार घेणाऱ्यांची संख्या सहा लाखांहून कमीदेशात कोरोनातून बरे झालेल्यांचे प्रमाण ९१.६८ टक्क्यांवर पोहोचले असून, अशा रुग्णांची संख्या ७५.४४ लाख झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८२ लाखांवर पोहोचली आहे. सध्या ५,६१,९०८ कोरोना रुग्ण उपचार घेत असून गेले सलग चार दिवस हा आकडा सहा लाखांपेक्षा कमी आहे.