मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज दिवसभरात ५ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण १७ लाख ४२ हजार १९१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे (रिकव्हरी रेट) ९३.४५ टक्के झाले आहे.
आज राज्यात ४ हजार ९८१ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना मृतांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे ४७ हजार ९०२ इतके रुग्ण दगावले आहेत. राज्यातील कोरोना मृत्यूदर २. ५७ टक्के इतका झाला आहे.
कोरोना लसीचे वितरण करण्यासाठी समितीराज्यात कोरोनाचा फैलाव टळावा यासाठी येऊ घातलेली लस तातडीने वितरीत करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. या वितरणात सुसूत्रता यावी यासाठी सरकारने राज्यात मुख्य सचिवांच्या स्तरावर एक समिती गठीत केली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ही लस राज्यात विविध ठिकाणी रवाना करणे, यासाठीची वाहतूक, शितगृह आणि लस देण्यासाठी प्रशिक्षण याचा समावेश आहे, असे टोपे म्हणाले.