मुंबई/कल्याण: संपूर्ण जगाला घोर लावणाऱ्या ओमायक्रॉननं महाराष्ट्रातही प्रवेश केला आहे. काल डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. मर्चंट नेव्ही इंजिनीयर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली. जहाजावर असल्यानं त्यानं कोरोना लस घेतलेली नव्हती. आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ओमायक्रॉनचे रुग्ण वाढवण्याची भीती व्यक्त होत आहे. कस्तुरबा रुग्णालयतील लॅबमध्ये काहींचे नमुने चाचणीसाठी आणण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल १ ते २ दिवसांत उपलब्ध होतील, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. मुंबईत ओमायक्रॉनचे १७ संशयित आहेत. त्यापैकी १३ प्रवासी आहेत, तर ४ जण त्यांच्या संपर्कातील आहेत. मुंबई वगळता राज्यात ओमायक्रॉनचे आणखी १७ संशयित आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागीतील अधिकाऱ्यांनी दिल्याचं टाईम्स ऑफ इंडियानं वृत्तात म्हटलं आहे.
धोकादायक देशांमधून मुंबईत दाखल झालेल्या ३ हजार ७६० प्रवाशांची यादी मुंबई महापालिकेकडे आहे. यातील २ हजार ७९४ प्रवाशांशी संपर्क साधण्यात आला असून त्यांची चाचणी झाली आहे. डोंबिवलीत ६० जणांची चाचणी झाली आहे. त्यातील २५ जण दिल्ली-मुंबई विमान प्रवासात मर्चंट नेव्ही इंजिनीयरसोबत होते. या सगळ्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती राज्य निगराणी अधिकारी डॉ. प्रदीप आवटेंनी दिली.
ओमायक्रॉनची लागण झालेल्या मर्चंट नेव्ही इंजिनीयरची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. २४ नोव्हेंबरला इंजिनीयर तरुण विमानळावर दाखल झाला. तिथे त्याची कोरोना चाचणी झाली. ती पॉझिटिव्ह आली. मात्र सौम्य लक्षणं असल्यानं तो होम क्वारंटिन होता. त्यानंतर तरुणानं खासगी लॅबमध्ये चाचणी केली. आपण दक्षिण आफ्रिकेतून आलो असून कोविड पॉझिटिव्ह असल्याचं त्यानं लॅबच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर लॅबनं ही माहिती केडीएमसीला दिली.