मुंबई : राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येने बुधवारी दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात ६७९ रुग्ण बरे झाले असून राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १० हजार ३१८ झाली आहे. तर, बुधवारी नोंद झालेल्या २ हजार २५० नव्या बाधितांमुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३९ हजार २९७ इतकी झाली आहे.दिवसभरात ६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ हजार ३९० झाली आहे. आज दिवसभरातील ६५ मृतांमध्ये ४६ पुरुष आणि १९ महिलांचा समावेश आहे. आजच्या ६५ मृत्यूपैकी ३२ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत. तर ३१ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. दोन जण ४० वर्षांखालील आहेत. या ६५ रुग्णांपैकी ४८ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. एकूण मृतांपैकी मुंबईमध्ये सर्वाधिक ४१, पुण्यात १३, नवी मुंबईमध्ये ३ तर औरंगाबाद शहर, उल्हासनगर आणि सोलापुरात प्रत्येकी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १८४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण १५ हजार ४९५ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.११ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
CoronaVirus News : कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने गाठला दहा हजारांचा पल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 6:20 AM