अतुल कुलकर्णीमुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांचा ग्राफ शून्यावर येणार नाही. तो वर-खाली होत राहील. त्यामुळे येत्या काळात साधे सर्दी-पडसे झाले तरी कोरोनाची तपासणी करावी लागेल, असे मत सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले आहे.डॉ. ओक म्हणाले, अत्यंत आक्रमकपणे राज्यभरात तपासणीचे काम हाती घ्यावे लागेल. त्यासाठी तपासणीची फी ९९९ रु. किंवा एक हजार रुपयाच्या आत झाली पाहिजे, अशी शिफारस आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. टास्क फोर्सच्या आग्रहामुळे रेमडेसिविर आता रुग्णांना उपलब्ध होईल. भारतीय कंपन्या त्याचे उत्पादन सुरू करत आहेत. या औषधाचे परिणाम येत्या आठ दिवसांत दिसू लागतील, असे सांगून डॉ. ओक म्हणाले, कोरोनाचा विषाणू श्वासनलिकेत घर करतो, तेथे त्याची वाढ प्रचंड वेगाने होते, या विषाणूच्या आरएनए ब्लॉक करण्याचे काम हे इंजेक्शन करते. हे कोरोनावर रामबाण इंजेक्शन नाही, मात्र प्राप्त परिस्थितीत याशिवाय दुसरे औषधही नाही. हे औषध येण्यासाठी उशीर झाला, मात्र यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्लीत बोलावे लागले. त्यानंतर सूत्रे हलली, असेही डॉ. ओक यांनी सांगितले.केंद्र सरकारची टीम मुंबईत आली तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात साडेचार लाख रुग्ण होतील. १३,००० आयसीयूचे बेड लागतील आणि ७,५०० व्हेंटिलेटर लागतील, असे प्रोजेक्शन दिले होते. तेवढी आपली तयारी नव्हती. त्यातूनच खासगी हॉस्पिटलचे ८०% बेड ताब्यात घेण्याचा निर्णय झाला. आज आपण त्यावर खूप चांगली मात केली आहे. केंद्राने दिलेले आकडे सुदैवानी खोटे ठरले आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये आकारले जाणारे बिल पाहून माझेच डोळे पांढरे झाले होते, असे ते म्हणाले.> काही हॉस्पिटलनी तर पीपीई किटचे बिल गुणाकार करून लावले होते. याविषयी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष खासगी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला ताकीद देण्यात आली. तपासणीचे दर सरकारने ठरवून दिले.- डॉ. संजय ओक,टास्क फोर्सचे प्रमुख
CoronaVirus News : चिंताजनक! मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर येणार नाही!
By अतुल कुलकर्णी | Published: June 23, 2020 4:45 AM