नागपूर : विदर्भाच्या सात जिल्ह्यातील कोरोना स्थिती सध्या गंभीर वळणावर आहे. अत्यवस्थ आणि ऑक्सिजनची आवश्यकता असलेले रुग्ण सातत्याने वाढत असल्याने खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ‘बेड देता का बेड’ असा टाहो फोडत रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयांची दारे ठोठावत आहेत. सर्वात आणिबाणीची स्थिती नागपुरात आहे. नागपुरात खाटा उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्ण अमरावतीत पाठवण्यात येत आहेत. नागपूरसह यवतमाळ, भंडारा, बुलडाणा, वर्धा, अकोला आणि गोंदिया जिल्ह्यांत खाटांचा प्रश्न गंभीर होत चाललाय. वाशीम आणि चंद्रपूर काठावर आहेत.
अमरावतीचा नागपूरला आधार- फेब्रुवारी-मार्च महिन्यात स्फोट झालेला कोरोना संसर्गाचा आलेख आता घसरला आहे. सध्या विविध वर्गवारीतील ४० रुग्णालयांत २,८०६ बेडची संख्या आहे. - यामध्ये ९९७ बेड व्याप्त असल्याने १,८०७ बेड रिक्त आहेत. त्यामुळे अन्य जिल्ह्यांतील रुग्ण येत आहेत. शनिवारी नागपूर येथून ३१ गंभीर रुग्णांना जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नागपुरनागपुरात रुग्णांना खाटांसाठी वणवण भटकावे लागत आहे. शासकीयच नव्हे तर खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा खाटांची कमतरता आहे. २५०० खाटा शासकीय रुग्णालयात तर खासगीमध्ये ३५०० खाटा आहेत. दररोज ५५० रुग्ण दाखल होत आहेत. रविवारी ५५ रुग्ण वेटिंगवर होते. त्यामुळे रुग्णांना अमरावतीला पाठविण्यात येत आहे.
बुलडाणाशासकीय, खासगी मिळून ७,८३५ खाटा उपलब्ध आहेत. पैकी १०५७ खाटा व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधेसह आहेत. अकोला, जालना, अैारंगाबाद आणि जळगावच्या सीमावर्ती गावातील रुग्ण बुलडाण्यात येतात.
चंद्रपूर कोविड हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर व डेडिकेड कोविड सेंटरमध्ये १९३४ पैकी केवळ ५३० खाटा शिल्लक आहेत. प्रसार वेगाने वाढत असल्याने खाटांची स्थिती मोठी बिकट होऊ शकते. शासकीय रूग्णालयात कोविडसाठी १३५४ तर खासगी रूग्णालयात ५८० खाटा राखीव आहेत. रोज सुमारे २० गंभीर रूग्ण दाखल होतात. सुमारे ३५० रूग्ण बरे होऊन घरी जातात.
वर्धा सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय व सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात कोविडच्या ६०० खाटा आहेत. दोन्ही रुग्णालयातील खाटा सध्या फुल्ल आहेत. दोन्ही रुग्णालयात रोज १०० हून अधिक गंभीर बाधित दाखल होतात. वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, नांदेड येथून उपचारासाठी रुग्ण दाखल होतात.
वाशिम सद्यस्थितीत १३१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. खासगी कोविड हॉस्पिटलची संख्या वाढविल्याने तूर्तास तरी ऑक्सिजनच्या ३२५ व आयसीयूच्या ३६ खाटा उपलब्ध आहेत.
गडचिराेली सध्या १० रूग्णालयांमध्ये १ हजार १९३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सरकारी कोविड केअर रूग्णालयांमध्ये २ हजार ५४ खाटा उपलब्ध आहेत. दैनंदिन २०० च्या घरात नवीन रुग्णांचे प्रमाण असले तरी खाटांची कमरतरता नाही.
भंडाराजिल्ह्यात १२२५ खाटा आहेत. तालुका स्तरावर ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने सर्व रुग्ण भंडाराकडे धाव घेतात. जिल्हा रुग्णालयात ४२५ खाटांची क्षमता आहे. तेथे एकही खाट शनिवारी शिल्लक नव्हती. जिल्ह्यात खासगी रुग्णालयात ३२४ खाटांची सुविधा असून तेथे २९४ रुग्ण दाखल आहेत. २५० नवीन रुग्ण व शंभर काेराेनामुक्त असे व्यस्त प्रमाण असल्याने खाटांचा प्रश्न गंभीर झाला आहे.
गोंदियादोन मोठ्या कोविड केअर सेंटर्समधील अर्धेअधिक बेड फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. संसर्गाचा वेग बघता येत्या काही दिवसात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. शासकीय रुग्णालयात ७१८ खाटा असून फक्त २४६ खाटा शिल्लक आहेत. आठ खासगी रुग्णालयातील सर्व ४५३ खाटा फुल्ल असून एकही खाट शिल्लक नाही. दररोज सरासरी ८० रुग्ण दाखल होत आहेत व ८५ जणांना सुटी दिली जात आहे.
यवतमाळएक शासकीय, १७ खासगी कोविड रुग्णालये आहेत. गंभीर रुग्णांची संख्या जास्त असल्याने खाटांची कमतरता आहे. शासकीय रुग्णालयात ५७० खाटा आहेत. त्यातील गंभीर रुग्णांसाठीच्या खाटा फुल्ल आहेत. खासगी रुग्णालयात ५२१ खाटा आहेत. तेथे ३६९ रुग्ण उपचार घेत असून आयसीयू व ऑक्सिजन सुविधेचे बेड फुल्ल आहेत. रोज सरासरी दीडशे रुग्ण दाखल होतात.
काय आहेत कारणे?गेल्या काही दिवसांपाूसन गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आयसीयू, ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटांची संख्या तुलनेने कमी आहे. गंभीर रुग्ण बरे होण्यास १५ ते २० दिवस लागतात. काही रुग्णांना महिनाही लागतो. नवे रुग्ण अधिक व बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे.आरटीपीसीआर न करता अनेक जण सिटीस्कॅनच्या आधारावर उपचार घेत आहेत.