- हरीश गुप्तानवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचे संकेत फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातून मिळाले होते. तथापि, तेव्हा त्याकडे तज्ज्ञ अथवा सरकार यापैकी कोणीच लक्ष दिले नाही, असे हाती आलेल्या आकडेवारीवरून आता समोर आले आहे.१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १,९४८ होती, तर देशातील एकूण रुग्णसंख्या ८,५७९ इतकी होती. ही संख्या तशी कमी असली तरी देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील संसर्गाचा प्रमाण तब्ब्ल २२ टक्के होते. त्यामुळे संख्या कमी दिसत असली तरी ती फसवी होती. कोविड पुन्हा डोके वर काढत होता. १ मार्च रोजी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ६,३९७ झाली. देशाच्या रुग्णसंख्येच्या (१२,२७०) तुलनेत हे प्रमाण तब्बल ५२ टक्के होते. १ एप्रिलपर्यंत देश मोठ्या लाटेच्या विळख्यात सापडला होता. देशातील रुग्णंसख्या ६ पटीने वाढून ८१,३९८ झाली होती, तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ७ पटीने वाढून ४३,१८३ झाली होती. दिल्लीतील रुग्णसंख्या ३० दिवसांत १० पट, तर उत्तर प्रदेशातील रुग्णसंख्या तब्बल ३१ पट वाढली होती.
देशाच्या तुलनेत राज्यातील रुग्णसंख्या १२ टक्के१८ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ६८,६३७ आणि देशातील रुग्णसंख्या २,७४,९४४ झाली. हा महाराष्ट्रातील सर्वोच्च बिंदू होता; पण एकूण रुग्णांतील राज्याचे प्रमाण आता घटून २४.५६ टक्क्यांवर आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाट्याने घटू लागली. ६ मे रोजी भारतातील रुग्णसंख्या ४.१४ लाखांच्या सर्वोच्च बिंदूवर गेली, तेव्हा महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ६२,१९४ आणि प्रमाण १५ टक्के झाले. २८ मे रोजी महाराष्ट्र २०,७४० रुग्णांसह चौथ्या स्थानी आला. कर्नाटक (२२,८२३), केरळ (२२,३१८) आणि तामिळनाडू (३१,०७९) ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. देशाच्या तुलनेत राज्यांतील रुग्णसंख्या आता केवळ १२ टक्के आहे.