मुंबईः कोरोना संकटकाळातही राज्याच्या राजकारणात टीका-टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू आहेत. खास करून माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विरुद्ध शिवसेना यांच्यात रोजच ‘सामना’ रंगत असल्याचं चित्र आहे. सत्ताधारी घरात बसल्याने आम्ही फिरणार, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. त्यावर, विरोधी पक्ष ‘हेल्थ आणि डिझास्टर टुरिझम’मध्ये व्यस्त असल्याची टिप्पणी आदित्य ठाकरे यांनी केली. त्याला, ‘नया है वह’ म्हणत फडणवीसांनी उत्तर दिलं. त्याचवेळी, रोज-रोज काय बोलता?, सरकार पाडूनच दाखवा, असं आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ची खिल्ली उडवलीय. या पार्श्वभूमीवरच, शिवसेनेनं पुन्हा फडणवीसांना चिमटा काढला आहे. (Shiv Sena taunts Devendra Fadnavis)
देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व कोरोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. पण, आता प्रवचनं नकोत. सगळ्या नकारात्मक परिणामांमधून जनतेची सुटका कशी होईल, तेवढंच सांगा साहेब, असा टोमणा ‘सामना’च्या अग्रलेखातून सेनेनं मारलाय. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनाही त्यांनी लक्ष्य केलंय.
ठळक मुद्देः
>> कोरोनाबाबतच्या बातम्या संमिश्र आहेत. जो तो आपापल्या पद्धतीने आता कोरोनावर प्रवचने देऊ लागला आहे. कोरोना हे शंभर वर्षांतले सर्वात मोठे संकट आहे अशी नवी दुर्मिळ माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीदेखील आता दिली. कोरोनामुळे उत्पादन, नोकऱ्या तसेच आरोग्यावर अभूतपूर्व असा नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे, असेही दास म्हणतात. पण साहेब, प्रवचने नकोत!
>> महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस हे सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व कोरोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे.
>> काही दिवसांपूर्वी आपले पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी योगी सरकारने जे कष्ट घेतले, जे एक यशस्वी 'मॉडेल' राबवले त्याचे कौतुक केले. आम्हीही त्याच मताचे आहोत.
>> उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात 'कोरोना' नियंत्रणात आल्याशिवाय देशात कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकता येणार नाही. त्यामुळे केंद्राने उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांकडे कोरोनासंदर्भात जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे.
>> ''धारावीत जे कोरोनावर यश मिळालं ते फक्त संघ स्वयंसेवकांमुळेच!'' असा नवा प्रचारी फंडा राबवला जातोय. हा जरा अतिरेकच झाला. पांढऱ्या कपड्यांतील देवदूतांचा अपमान आहे.
>> संघाला कोरोना युद्धात उगाच ओढण्याचे कारण नाही. प्रत्येक जण आपापल्या कुवतीने लढतो आहे. हे यश सामुदायिक आहे, मात्र त्यातही मुंबई महापालिकेचे काम मोठे आहे हे तुम्ही मान्य करणार की नाही?
संबंधित बातम्या
ती आमची राजकीय चाल होती; देवेंद्र फडणवीसांच्या 'गौप्यस्फोटा'वर शरद पवारांचा 'स्फोट'
नया है वह! मंत्री झाल्याने शहाणपण येतं असं नाही; देवेंद्र फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
सरकार पाडून दाखवाच; शिवसेनेचे भाजपाला आव्हान
''विरोधी पक्ष नेत्यानेच केंद्राकडून निधी मिळण्यासाठी मदत करावी''
"...म्हणून फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मनाला, बुद्धीला चालना मिळते"