उस्मानाबाद : कोविड उपचारासाठी वापरात आणल्या जात असलेल्या काही गोळ्यांची बनवेगिरी गुप्तचर विभागाने औषध प्रशासनाच्या मदतीने उघडकीस आणली आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावाने फॅविमॅक्स या गोळ्यांची निर्मिती करून त्यांची राज्यभर विक्री केली गेली आहे. या गोळ्यांमध्ये स्टार्च पावडरसाठी वापरले जाणारे घटक असल्याचे तपासणीतून उघड झाल्यानंतर, आता राज्यभरातून या गोळ्यांची विक्री थांबवून त्या एकत्र केल्या जात आहेत.कोविड उपचारासाठी फॅविमॅक्स ४०० व फॅविमॅक्स २०० नावाच्या गोळ्यांचा सर्वत्र वापर केला जात आहे. मात्र, या गोळ्या बनावट असल्याची माहिती मुंबईच्या गुप्तचर विभागास मिळाली होती. त्यांनी औषध प्रशासनाच्या मदतीने हिमाचल प्रदेशची उत्पादक कंपनी शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा स्ट्रिपवर दर्शविण्यात आलेल्या पत्त्यावर अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नसल्याचे समोर आले. मात्र, मुंबईतील तीन मोठ्या स्टॉकिस्टकडून राज्यातील बहुतांश भागात या गोळ्या वितरित केल्या आहेत. दरम्यान, या गोळ्यांचे नमुने मुंबईतीलच प्रयोगशाळेत तपासण्यात आले, तेव्हा त्यात स्ट्रिपवर दर्शविण्यात आलेले कोणतेही घटक नसल्याचे व त्याऐवजी स्टार्च पावडरचे घटक वापरल्याचे आढळून आले. तपासणी अहवाल येताच दोन दिवसांपूर्वी औषध प्रशासनाने मुंबईतील तिन्ही स्टॉकिस्टकडून या गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत. शिवाय, त्यांच्याकडून या गोळ्या राज्यात जेथे जेथे वितरित झाल्या, तेथून त्या एकत्र करण्याचे काम सुरू केले आहे. उस्मानाबादेत कारवाई; ९० स्ट्रिप घेतल्या ताब्यात उस्मानाबादेत लक्ष्मी मेडिकल व उमरगा येथील श्रीनाथ एंटरप्रायझेसकडे या गोळ्या आल्या होत्या. लक्ष्मी मेडिकलकडे फॅविमॅक्स ४०० च्या ४०, तर फॅविमॅक्स २०० च्या ३२० स्ट्रिप प्राप्त झाल्या होत्या. या सर्वच गोळ्या वापरात आल्याचे गुरुवारी निष्पन्न झाले आहे, तर उमरगा येथील श्रीनाथ एंटरप्रायझेसकडे आलेल्या ३०० स्ट्रिपपैकी २१० वापरात आल्या असून, ९० स्ट्रिप जमा करून घेतल्याची माहिती औषध निरीक्षक विलास दुसाने यांनी दिली. पत्त्यावर कंपनीच नाही, मार्केटिंग बंगालमधूनफॅविमॅक्स गोळ्यांचे उत्पादन करणाऱ्या हिमाचल प्रदेशातील मे. मॅक्स रिलीफ हेल्थकेअर कंपनीचा शोध घेतला गेला, तेव्हा नमूद पत्त्यावर या कंपनीचे अस्तित्वच आढळून आले नाही. यानंतर कारवाईला वेग देण्यात आला आहे. दरम्यान, या कंपनीच्या गोळ्यांचे मार्केटिंग कोलकाता येथील एक कंपनी करीत होती. तिचाही शोध घेण्याचे काम सुरू आहे.
CoronaVirus News: कोविडसाठीच्या गोळ्यांमध्ये स्टार्च पावडरचे घटक आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 10:54 AM