मुंबई: देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर देशातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत गेला. त्यामुळे अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले. त्यामुळे काही ठिकाणी कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला. विशेषत: केरळमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. एकीकडे लसीकरणाचा वेग वाढत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारनं तयारी सुरू केली आहे.
राज्य निगराणी अधिकारी असलेल्या प्रदीप आवटेंनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारनं पायाभूत सुविधांमध्ये दीडपटीनं वाढवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य दिलं आहे. उदाहरणार्थ, ज्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेत दिवसाला १०० रुग्ण आढळून आले होते, तिथे आता १५० बेड उपलब्ध करून दिले जात आहेत. डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहे.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास रुग्णांची संख्या ६० लाखांपर्यंत जाऊ शकते असा इशारा काही दिवसांपूर्वीच तज्ज्ञांनी दिला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेनंदेखील आवश्यक तयारी सुरू केली आहे. बेड्स आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर महापालिकेनं लक्ष केंद्रीत केलं आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी ३० हजार बेड्स तयार ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. चेंबूर आणि महालक्ष्मीमध्ये ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट सुरू करण्यात येत आहेत. तिसरी लाट आलीच, तर ऑक्सिजन कमी पडू नये याची खबरदारी महापालिकेकडून घेतली जात आहे.