मुंबई : राज्यात पुणे, मुंबई सारख्या मुख्य शहरांतून सुरू झालेली कोरोनाची तिसरी लाट आता ग्रामीण भागात पसरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण पाहता वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त करत कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परिणामी, वाढत्या प्रादुर्भावामुळे १ जानेवारी रोजी ३२,२२५ वर असणारी राज्यातील उपचाराधीन रुग्ण आता १७ जानेवारी रोजी २,६७,३३४ वर पोहोचली आहे. म्हणजेच यात तब्बल ७३६ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये केवळ एकअंकी सक्रिय रुग्णसंख्या होती, यातही कमालीची वाढ होऊन ही संख्या आता १०० ते ३०० च्या घरात गेली आहे. मागील दोन आठवड्यांत सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झालेल्या जिल्ह्यांत वाशिम, नंदूरबार , विदर्भ, यवतमाळ, गडचिरोली, हिंगोली, भंडारा व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे.आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या लाटेच्या संसर्गाचे स्वरूप पहिल्या लाटेसारखे आहे. तेव्हाही शहरानंतर ग्रामीण भागात संसर्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले होते. मागील दोन ते तीन आठवड्यांत १० जिल्ह्यांत दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंचे प्रमाण सारखे आहे. मात्र, अन्य सात जिल्ह्यांत हे प्रमाण वाढले आहे. पालघर जिल्ह्यात मृत्यूदर ०.६ टक्क्यांनी वाढला आहे. तर, मुंबईत हे प्रमाण ०.५ टक्क्यांनी वाढले आहे. राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, पुढील दोन आठवड्यांमध्ये मृत्यूंच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संसर्गाच्या स्थितीवर करडी नजर आहे. मुंबईत कोरोना रुग्ण घटले असले, तरीही जिल्ह्यांमधील परिस्थितीनंतरच याबाबत निष्कर्ष काढता येईल.
CoronaVirus News: तिसऱ्या लाटेने पसरले ग्रामीण भागात ‘हातपाय’; उपचाराधीन रुग्णसंख्येत ७३६ टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 6:32 AM