मुंबई/सिंधुदुर्ग - राज्यातील कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. दरम्यान, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा म्हणावा तसा प्रभाव दिसून आला नसला तरी मुंबई, ठाणे आणि पुण्याहून येत असलेल्या चाकरमान्यांमुळे येथील प्रशासनासमोर कोरोनाला रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, काल सिंधुदुर्गात एका तरुणीचा कोरोना चाचणी अहवाल पहिल्यांदा पॉझिटिव्ह आणि नंतर तासाभरानंतर केलेली दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे भाजपा आमदार नितेश राणे स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.नितेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट करून या प्रकाराबाबत सवाल उपस्थित केला आहे. या सरकारवर कोण विश्वास ठेवणार, एका महिलेचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो. त्यानंतर मग एका तासात हा रिपोर्ट निगेटिव्ह होतो, हा चमत्कार सिंधुदुर्गात होतो, असे सांगत नितेश राणे यांनी झाल्या प्रकारावर सवाल उपस्थित केला आहे.
सिंधुदुर्गात आतापर्यंत कोरोनाचे आठ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात एका तरुणीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त सोशल मीडियावरून पसरले. मात्र नंतर या तरुणीचा दुसरा चाचणी अहवाल हा निगेटिव्ह असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकारामुळे काही काळ संभ्रम निर्माण झाला होता.