नागपूर - कोरोनाविरोधात देशाचे ऐक्य दाखवण्यासाठी सर्व देशवासियांनी रविवारी रात्री नऊ वाजता घरातील दिवे बंद करून घराच्या दारात किंवा खिडक्यांवर येऊन टॉर्च, पणत्या, दिवे पेटवावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मात्र मोदींच्या या आवाहनावरून मोठा वाद पेटला आहे. त्यात अशाप्रकारे सर्व दिवे मालवल्यास देशातील पॉवर ग्रीड ठप्प होऊन वीजपुरवठा बंद होईल, अशी भीती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली होती. मात्र नितीन राऊत हे नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, कमीजास्त वीजपुरवठ्याचे नियोजन करणे सहजशक्य आहे. तसेच असे नियोजन करण्यासाठी सरकारकडे पुरेसा वेळ आहे. नितीन राऊत यांनी पॉवर ग्रीड आणि वीजपुरवठा खंडित होण्याबाबत केलेले आवाहन हे दिशाभूल करणारे आहे. गेली पाच वर्षे मी ऊर्जामंत्री म्हणून काम पाहत होतो. या काळात वीजेचा कमीजास्त पुरवठा करण्याचे प्रसंग अनेकदा आले. आपल्याकडील कोयना, घाटघर सारख्या वीजप्रकल्पात काही मिनिटांमध्ये वीजपुरवठा कमीजास्त करता येण्याची क्षमता आहे.
coronavirus : वीजपुरवठ्याबाबत नितीन राऊत यांच्याकडून दिशाभूल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 1:50 PM