रत्नागिरीत असलेल्या साखरतर येथील एका कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या अहवालानंतर कोरोनाबाधित महिलेच्या कुटुंबामधील १४ नातेवाईकांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये १४ नातेवाईकांमधील एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यामुळे रत्नागिरीतील कोरोनाबाधितांची संख्या ५ वर पोहचली आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्णाची वाढ झाली नाही. यामुळे जिल्ह्यातील लोकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरीत आतापर्यंत ५ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. गुहागर येथील पॉझिटिव्ह रूग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. तर आता ३ रूग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.संबंधित महिला ४८ वर्षाची आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन विभागामध्ये उपचार सुरू आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सुदैवाने वाढ झालेली नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. नागरिकांनी घाबरु नये, सहकार्य करावं अशी जनजागृती जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. ९ ते ११ एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या १०३ स्वॅबचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये ३०२ जण क्वॉरन्टाईन असून तर होम क्वॉरन्टाईनची संख्या १०५३ आहे.
दरम्यान, राज्यात रविवारी 221 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 झाली आहे. तसेच मुंबईत कोरोनाची स्थिती दिवसागणिक चिंताजनक बनत चालली आहे. रविवारी एकाच दिवसात मुंबईत सहा बळी गेले आहेत, त्यामुळे मुंबईत मृतांचा आकडा ९१ वर पोहोचला आहे. तर रविवारी दिवसभरात १५२ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या १ हजार २९८ झाली आहे.