मुंबई : राज्यात मे महिन्यामध्ये साधारणतः पिण्याच्या पाण्याची कमतरता भासते. यासाठी शासनाने योग्य ती खबरदारी घेऊन जिल्हा, तालुका पातळीवर योग्य ती काळजी व उपाययोजना आताच करायला हव्यात. पाणी संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवायला हवी, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.
संपूर्ण विश्वात आज एकाच समस्येची चर्चा सुरू आहे ती म्हणजे कोरोनाचे संकट. कोरोनाचा सामना धीराने व योग्य नियोजन करून केला पाहिजे. भारतातही केंद्र सरकार व राज्य सरकार, संपूर्ण शासकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी हे सगळेजण कोरोनाला पराभूत करण्यासाठी धीराने उभे राहिले आहेत. अर्थकारणावर या महामारीचा विपरीत परिणाम झाला आहे. बाजारपेठेला मर्यादा आल्या आहेत. शेतीवरही परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू बाजारात येण्यास संकटं येत आहेत. हातात आलेले पीक सोडून देण्याची भूमिका शेतकऱ्याला घ्यावी लागतेय, हे खूप धोक्याचे आहे, अशी चिंताही पवारांनी व्यक्त केली. पवारांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले.
उद्योग बंद असल्याने उद्योजकांवर कामगारांची जबाबदारी वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात बेकारी व बेरोजगारीचे संकट वाढू शकते. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढेल असे दिसत असल्याने आपण आताच योग्य खबरदारी घ्यायला हवी, अशी सूचनाही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. कोरोनाचे संकट एक-दोन महिन्यांचे नसून आर्थिक क्षेत्रात यावर मात करण्यासाठी पुढील एक-दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. यासाठी केंद्राने अजून खबरदारी घ्यायला हवी, असा इशारा पवार यांनी दिला आहे.
परप्रांतीयांचे काय?परप्रांतीय कामगार हे आता आपल्या गावी जाण्याच्या मानसिकतेत आहेत. परंतु राष्ट्र पातळीवर जे धोरण ठरले आहे त्यानुसार त्यांना प्रवास करण्याची सुविधा आपण देऊ शकत नाही. मात्र, त्यांना अन्न व आरोग्य सुविधा देण्यासाठी आपले प्रशासन तसेच अन्य सेवाभावी संस्था पुढे येत आहेत. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. सरकारकडून या कामगारांना काही निधी देऊन, आधार देण्याची व्यवस्था होत आहे, असेही पवार म्हणाले. म्हणून कुठल्या पक्षाचे सरकार आहे हे न पाहता या संकटावर मात करण्यासाठी पावले टाकण्याची गरज आहे. वांद्रे येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे आवाहनही पवारांनी विरोधी पक्षांना केले आहे.