मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने रुग्णसंख्येचा वेग मंदावला असे सांगितले असले तरी आता शनिवारी दिवसभरात राज्यासह मुंबईची रुग्णसंख्या वाढली आहे. शनिवारी राज्यात तब्बल ३२८ कोरोना रुग्णांचे निदान झाले, यातील एकट्या मुंबईत १८४ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ३ हजार ६४८ वर पोहोचली आहे. तर मुंबईत एकूण २ हजार २६८ कोरोना रुग्ण झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २११ झाली आहे, तर मुंबईत ही संख्या १२६ इतकी आहे.
राज्यात शनिवारी ११ मृत्यूंची नोंद झाली आहे. या पूर्वी ११ एप्रिल रोजी कळवलेला एक मृत्यू कोरोना निगेटिव्ह असल्याचे मुंबई मनपाने कळवल्याने हा मृत्यू एकूण मृत्यूमधून वगळण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईतील ५ आणि पुणे येथील ४ तर १ मृत्यू औरंगाबाद मनपा आणि १ मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. त्यात ६ पुरुष तर ५ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत. तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ९ रुग्णांमध्ये ८२ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ हजार ४६८ नमुन्यांपैकी ६३ हजार ४७६ जणांचे कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८२ हजार २९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.