मुंबई – राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा अडीच हजारांहून अधिक झाला आहे. त्यामुळे राज्य शासनासमोर संसर्ग संक्रमण रोखण्याचे आव्हान गडद होते आहे. राज्यात मंगळवारी ३५० रुग्णांचे निदान झाले, यात सर्वाधिक रुग्ण २०४ मुंबईतील आहेत. यामुळे राज्याची रुग्णसंख्या २ हजार ६८४ वर पोहोचली आहे. तर मंगळवारी राज्यात १८ मृत्यूंची नोंद झाली, त्यातील ११ मुंबईत असून राज्याचा मृतांचा आकडा १७८ वर पोहोचला आहे. याखेरीज दिलासादायक म्हणजे राज्यात आजपर्यंत २५९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात मंगळवारी झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ११, पुण्यातील ४ तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. एक मृत्यू राज्याबाहेरील नागरिकाचा आहे. यात ११ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूपैकी ५ जण हे ६० वर्षांवरील आहेत ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या १८ जणांपैकी १३ रुग्णांमध्ये ७२ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. या रुग्णांपैकी एकाला कर्करोग तर एकाला क्षयरोग होता. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १७८ झाली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४६,५८८ नमुन्यांपैकी ४२,८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. राज्यात आजमितीस एकूण ५०५९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी १८.३७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ६७,७०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ५,६४७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
सहा महिन्यांच्या बाळाने जिंकली लढाई
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी जनतेला संबोधताना सहा महिन्यांच्या बाळाने कोरोनाविरोधातील लढाई जिंकल्याची माहिती दिली. या लहानग्या बाळाशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधत आपुलकीने चौकशी केल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे, एका ८३ वर्षीय ज्येष्ठ महिलेने कोरोनावर मात केल्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. त्यामुळे कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणे शक्य आहे. सामान्यांनी घाबरुन न जाता शासनाला सहकार्य करा आपण ही लढाई नक्की जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.