मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 28 वर्षीय महिला फ्रान्स व नेदरलँड या देशांत प्रवास करून पुण्यात आली आहे. त्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याची तपासणी अहवालातून समोर आल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18वर पोहोचली असून, राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 42 झाला आहे.कोरोना विषाणूचा पहिला बळी काल मुंबईत गेला. दुबईहून परतलेल्या एका 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि आता पुण्यात प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42 झाली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे सर्वाधिक १० रुग्ण आहेत. तर मुंबई 7 आणि पुण्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आले आहेत. उपराजधानी नागपुरात कोरोनाचे चार जण रुग्ण आहेत. तर नवी मुंबई, कल्याण, यवतमाळमध्ये प्रत्येकी तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे.
राज्यात मंगळवारी नव्या 105 संशयित रुग्णांना भरती करण्यात आलं आहे. आतापर्यंत बाधित भागातून एकूण 1,169 प्रवासी राज्यात आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात 900 जणांना भरती करण्यात आले आहे. यापैकी 779 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत.