स्नेहा मोरे
मुंबई : देशासह राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने पसरतोय. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने ११ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, कोरोना रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे, तर मृतांमध्ये ५१ ते ६० वयोगटांतील रुग्णांचे सर्वाधिक प्रमाण आहे.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, राज्यात २१ ते ३० वयोगटांतील कोरोनाबाधित दोन हजार ३५६ रुग्ण आहेत, तर ३१ ते ४० या वयोगटातील दोन हजार १८३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय, ४१ ते ५० वयोगटातील एख हजार ८३५ जणांना तर ६१ ते ७० वयोगटातील ८८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय, राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत ७६ टक्के रुग्ण लक्षण विरहित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या व्यक्तींकडून संसर्गाचा धोका कायम आहे, तर २२ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत आहेत तर दोन टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.पुरेशी झोप आवश्यकआहारतज्ज्ञ डॉ. ऋषी मुळीक यांनी सांगितले की, निरोगी जीवनशैली, पाचक आहार आणि काही निवडक आहारातील पूरक घटक व्हायरल इन्फेक्शनच्या प्रतिरक्षा प्रतिसादाला अनुकूलित करण्यात भूमिका बजावू शकतात. ध्यान, योग, किंवा श्वासोच्छ्वासाच्या व्यायामासारख्या क्रियाकल्पाने ताणातील संप्रेरक कमी करण्यास आणि प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. या साथीच्या रोगाच्या दरम्यान, रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. याशिवाय, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तरुणांनी आपल्याला काही होणार नाही, या अविर्भावात घराबाहेर पडू नये, कारण स्वत:मुळे घरातील ज्येष्ठांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.
३८९ बालकांना झाली कोरोनाची लागणराज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे चिंतेचे कारण झाले असून, शून्य ते १० या वयोगटातील तब्बल ३८९ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ११ ते २० वयोगटातील ७९६ बालकांना कोरोना झाला असून, यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.