दोन वर्षांपूर्वी भयंकर महामारी निर्माण करणाऱ्या कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजविला. घर, गल्ली, चौक, रस्ता, गाव, जिल्हा अशा प्रत्येक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळू लागले. त्यातून काहींना ऑक्सिजनअभावी प्राणही गमवावे लागले. कधी टाळ्या तर थाळ्या वाजविण्यात येऊनही कोरोना कमी होत नसल्याचे पाहून खासदार रामदास आठवले यांनीच अखेर पुढाकार घेऊन 'गो कोरोना गो... ची हाळी दिली. ती क्षणार्धात पॉप्युलर झाली आणि प्रत्येकाच्या तोंडी 'गो कोरोना, गो..'चा गजर सुरू झाला.
भले, विज्ञानवादी व बुद्धिवाद्यांनी भलेही आठवले यांच्या या विधानाची खिल्ली उडविली; परंतु आठवले हे आपल्या घोषणेवर ठाम राहिले. नंतर कोरोनाने काढता पाय घेतला; परंतु आता पुन्हा भल्याभल्या देशांना कोरोनाने विळखा घातला आहे. संसदेत त्यावर गंभीर चर्चा झाली. दिल्लीत बैठका होत असताना एका समाजमाध्यमाला मुलाखत देताना मात्र आठवले यांना पुन्हा आपली घोषणा आठवली आहे. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यास आपण पुन्हा गो कोरोना, गो...' म्हणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.