नंदुरबार : राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने अजूनही लोकांनी काळजी घ्यावी, नियम पाळावेत ही कळकळीची विनंती आहे. अन्यथा, पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.लसीकरण मोहिमेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे शुक्रवारी मोलगी व धडगाव येथे आले होते. सुरुवातीला त्यांनी मोलगी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची पाहणी केली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून तेथेच अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या वेळी आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी, कृषिमंत्री दादा भुसे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतात. मात्र ग्रामीण, दुर्गम-अतिदुर्गम भागातही चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.
नवा स्ट्रेन नाही - - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्या वाढली असून ही चिंता वाढविणारी बाब आहे. - गेल्यावर्षी आपल्या हातात उपाययोजनेसाठी काही नव्हते. पण आता मात्र लस ही ढाल म्हणून मिळाली असून दुर्गम, अतिदुर्गम भागातील शेवटच्या माणसापर्यंत लसीकरणाची सुविधा प्रशासनाने पोहोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. - राज्यात नाशिकसह कुठेही कोरोनाचा नवा स्ट्रेन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मी लस घेतलीय, तुम्हीही घ्यामुख्यमंत्री ठाकरे यांनी लसीकरण घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून, ‘मी लस घेतली आहे, पूर्णपणे सुरक्षित आहे, घाबरू नका, लस घ्या...’ असे आवाहन केले. तसेच ज्यांनी लस घेतली अशा नागरिकांशीही संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले.