मुंबई : कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक 32 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे याचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत. तर, यासंदर्भात नागरिकांनी काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून जनजागृती करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी रविवारी फोनवरून चर्चा केली. यावेळी राज्यातील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा आणि त्यासंबंधी उपाययोजना यावर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून एएनआय वृत्तसंस्थेला सांगण्यात आले.
दरम्यान, राज्यात काल कोरोनाच्या चौदा नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर आज औरंगाबाद येथील 59 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. रशिया व कझाकिस्तानचा प्रवास करून ही महिला भारतात परतली आहे. सध्या औरंगाबादेतल्या धूत रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 32 झाली आहे.
चीनमधील कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.
याचबरोबर, कोरोनामुळे आतापर्यंत देशात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 96वरून वाढून 108वर पोहोचली आहे. याशिवाय, जगभरात 1,45,000 रुग्ण कोरोनाबाधित असून, जवळपास 5 हजार लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
करतारपूर कॉरिडोरही होणार बंदकरतारपूर साहिब कॉरिडोरही बंद करण्यात येणार आहे. नोव्हेंबर 2019मध्ये उघडण्यात आलेले करतारपूर कॉरिडोरमधून दररोज 650 ते 800 भाविक करतारपूर साहिब यांच्या दर्शनासाठी जातात. कोरोना संक्रमणानंतर भाविकांची संख्या कमी होऊन 250वर आली आहे.