कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई भारत देश अत्यंत ताकदीने लढत असून जगासमोर एक आदर्श ठेवत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. खेडं असो, गाव असो, शहर असो किंवा महानगर; प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने या लढाईत सक्रिय सहभाग देत आहे. लॉकडाऊनचं काटेकोर पालन करून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रयत्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत होतोय. देशभर सुरू असलेल्या याच प्रयत्नांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या माध्यमांतून घेत आहेत. त्याचाच भाग म्हणून आज मोदींनी, ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या सरपंच - उपसरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यावेळी चाकणजवळील मेदनकरवाडी (ता.खेड ) येथील युवा उच्च शिक्षित सरपंच प्रियांका मेदनकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण उत्तरांनी आणि हजरजबाबीपणाने पंतप्रधानांची शाबासकी मिळवली.
देशात सुरू असलेल्या लॉकडाऊन-2 चं योग्य पालन व्हावं, यादृष्टीने आपण आपल्या गावांत काय-काय उपाययोजना केल्या आहेत, असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी विचारला. त्यांचं विस्तृत उत्तर प्रियांका मेदनकर यांनी दिलं. घरोघरी साबण वाटप केले, महिला गटांना मास्क बनवण्याचं काम देऊन ते गावात वितरित केले, एक दिवस किराणा आणि एक दिवस भाजीची दुकानं सुरू ठेवून जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घेतली, भाज्या आणि धान्य हाऊसिंग सोसायट्यांपर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांनाही लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला, आशा वर्कर्सच्या मदतीने गावात सात हजार सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप केलं, होम क्वारंटाईनची व्यवस्था केली, कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दोन वेळा संपूर्ण गाव सॅनिटायइज केलं, असं प्रियांका यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वामित्व योजनेची घोषणा, गावागावांना होणार जबरदस्त फायदा
मोदी सरकार दुसरं मोठं पॅकेज देण्याच्या तयारीत; 48 तासांमध्ये होऊ शकते घोषणा
त्यानंतर, पंतप्रधान मोदींनी जरा मजेतच एक प्रश्न विचारला. गावकरी आता थकले असतील ना, त्यांना राग येत असेल, मोदींनी हे काय करून ठेवलंय म्हणत असतील ना?, असं मोदींनी विचारलं. तेव्हा, प्रियांका यांनी जनतेची अवस्था आणि काळाची गरज यांची उत्तम सांगड घालत उत्तर दिलं. लोकांना घरात राहायची सवय नसल्यानं ते जरा कंटाळलेत, पण पंतप्रधान आमच्या आरोग्यासाठी आणि देशाच्या हितासाठीच हे करत आहेत, याचीही जाणीव त्यांना आहे, असं प्रियांका म्हणाल्या.
पंतप्रधान मोदींनी गावाबद्दल, लोकसंख्येबद्दलची माहिती विचारून घेतली आणि काही सूचनाही केल्या. महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तूंना, शेतमालाला योग्य व्यासपीठ मिळण्यासाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
एक ना एक दिन ये हालात बदलेंगे जरूर
जाता जाता, प्रियांका मेदनकर यांनी पंतप्रधानांकडे काही पंक्ती सादर करण्याची परवानगी मागितली. आपण जगाला मार्ग दाखवत असल्याचं सांगून त्या म्हणाल्या,
कोशिश जारी है और हिंमत बरकरार है,
सिर पे है इस दुनिया पर छाने का फितूर,
मुझे किस्मत पर भरोसा नही, मुझे मेहनत पर भरोसा है,
एक ना एक दिन ये हालात बदलेंगे जरूर ।।
त्यांच्या या निर्धाराला सलाम करत, तुमचे शब्द हाच जनतेचा विश्वास आहे. हे शब्दच संकटातून बाहेर पडण्याचं बळ देतील, अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या.
मोदी सरकारच्या ‘रणनीती’ने कोरोना हरेल?; 93 टक्के लोक म्हणतात...
27 एप्रिलला कोरोना लढाईची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार