कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. परंतु आता रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी अद्याप धोका पूर्णपणे टळलेला नाही. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात २२ हजारांपेक्षा अधिक रूग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दरही आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात १८,६०० नव्य़ा कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे २२,५३२ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९३.५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे राज्यात ४०२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यात सध्या २,७१,८०१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत एकूण ५३,६२,३७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईतही रुग्णसंख्या घटली
मुंबईतही आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत १,०६६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १,३२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या २७,३२२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत एकूण ६,६१,२२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता ४१४ दिवसांवर गेला आहे.