मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपल्याला खूप काही शिकवलं. पहिल्या लाटेतून हळूहळू सावरत होते. सगळं काही सुरळित होत चाललं होतं. काही गोष्टी सुरू झाल्या होत्या. सामाजिक आणि राजकीय तसेच धार्मिक संमेलन होत होती, सण साजरे करायला लागले होतो परंतु याच दरम्यान कोरोनानं स्वत:चं स्वरुप बदललं आणि दुसरी लाट देशात आली असं राज्याचे टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितले.
डॉ. संजय ओक म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत चाळीशीतली माणसं इतकी गमावली नव्हती. एका वाक्यात जर पहिला आणि दुसरा लाटेचा फरक मला कोणी विचारला, तर पहिला लाटेमध्ये जर समजा सहा जणांचे कुटुंब असेल तर त्या कुटुंबातील एखादी व्यक्ती संक्रमित व्हायची पण दुसऱ्या लाटेत कुटुंबातील सहाच्या सहा बाधित होत आहेत. या पार्श्वभूमीवर आपण तिसऱ्या लाटेचा विचार करतो, आता ती कधी येईल त्याची व्याप्ती केवढी मोठी असेल खरंच लहान मुलं जास्त होतील का आणि त्यासाठी आपण कोणती तयारी करायला पाहिजे या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे.
तसेच लसीकरणाचा कार्यक्रम जितक्या वेगाने पुढे जायला हवा होता तेवढा पुढे गेला नाही. त्यामागे काही कारण असतील पण हे सत्य आहे. लोकं एकत्र येण्याची प्रवृत्ती, सोशल डिस्टेंसिंग पाळत नाही. आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहोत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिसरी लाट येईल अशी शक्यता होती. परंतु हे पाहता तिसरी लाट अपेक्षेपेक्षा अधिकच येण्याची भीती वाटते. २-४ आठवड्यातही तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा डॉ. संजय ओक यांनी दिला आहे.
जम्बो कोविड सेंटर गुंडाळू नका
जम्बो सेंटर गुंडाळू नका, लहान मुलं बाधित होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये मदर-चाईल्ड असा वेगळा कक्ष करायला हवा. कोरोना त्याच्यामध्ये बदल करतोय असं तज्त्र सांगतात. त्यामुळे तयारी करणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तिसरी लाट आली तरी त्याचा जास्त परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही संजय ओक म्हणाले.
नागरिकांनी काय करायला पाहिजे?
- मास्कला पर्याय नाही. माझ्यादृष्टीने सर्वात प्रभावी व्हॅक्सिन तुमचा मास्क आहे.
- सोशल डिस्टेंसिंग पाळणं गरजेचे आहे.
- वर्क फ्रॉम होम सुरूच ठेवा, जरा निर्बंध शिथिल झाले तर कार्यालये कर्मचाऱ्यांना बोलवतात त्याचं आश्चर्य वाटतं. वर्क फ्रॉम होम सुरूच ठेवले पाहिले पाहिजे.
- २०२१ वर्ष हे लसीकरणाचं आणि मास्कचंही आहे.
- होम क्वारंटाईन पाळलं जात नसेल तर अशांना आयसोलेशन करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात यावी.
- होम क्वारंटाईन असणाऱ्या रुग्णांसाठी नवीन औषधं येणार आहेत. कोणत्या वेळेला किती औषधं घ्यायची याचं विश्लेषण सरकारला सांगितलं आहे.
- मुंबईत आणखी ३ जम्बो कोविड सेंटर उभी करण्याचं काम सुरू आहे. तिसऱ्या लाटेसाठी पूर्ण तयारी सुरू आहे.
कोविडची लक्षणं कशी ओळखावी?
पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारासोबतच आता कोरोनादेखील आहे. त्यामुळे तुम्हाला एक दिवसापेक्षा जास्त सर्दी, खोकला, घशात खवखवणे, श्वास घेण्यात धाप लागत असेल तर घरात बसू नका. घरातील औषधं घेऊ नका. जवळच्या डॉक्टरांकडे जा, आरटीपीसीआर चाचणी करा. या रिपोर्टनंतर पुढील उपचार होऊ शकतात. दुखणं अंगावर काढू नका असा सल्ला डॉ. संजय ओक यांनी नागरिकांना दिला आहे.
कोविडची लस घेतल्यानंतर कोरोना होऊ शकतो का?
लस घेतल्यानंतरही मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग पाळलं पाहिजे. दुसरा डोस कधी घ्यावा याबाबत दुमत आहे. ते फक्त भारतातच नाही तर जगभरात सुरू आहे. इंग्लंडमध्ये अलीकडेच कोविशील्डचा दुसरा डोस ४ आठवड्यांच्या आत घ्यावा असं सांगितलं आहे. प्रत्येकाच्या शरीरात निर्माण होणाऱ्या अँन्टिबॉडीचा मात्रा बदलते. जगभरात यावर अभ्यास सुरू आहे. कोविड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो. मात्र तुम्ही लस घेतली तर कोविडची गंभीरता कमी होईल. आयसीयूत जाण्याची वेळ येणार नाही.
म्यूकरमायकोसिस, ब्लॅक फंगस आजाराबद्दल काय सांगाल?
डायबेटिस किंवा ज्या रुग्णांना अनेक दिवस स्टेरॉईड औषधं दिली गेली त्यांना ब्लॅक फंगस आजार होऊ शकतो. स्टेरॉईडचा अतिवापर रुग्णांसाठी धोकादायक आहे. जे रुग्ण ८-१० दिवस आयसीयूत राहिलेत त्यांना नोजल एन्डोस्कोपी करून त्यांच्यावर पुढील उपचार केले जातील. अँन्टी फंगल औषधं देणे हाच त्यावर उपचार आहे.