मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ वर पोहचली आहे. विलगीकरण कक्षात आज पर्यंत १३१७ जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी १०३५ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर ५२ जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत.
वाढता आकडा लक्षात घेत सरकारने विविध उपयोजना सुरू केल्या आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, नागपूर, यवतमाळ आणि इतर महत्वाच्या शहरातील लोकं आपापल्या गावी जात आहेत. मात्र गावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून लुट होत असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट तत्काळ थांबविण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत. काही बस कंपन्या प्रवाशांची, विद्यार्थी युवक-युवतींची अडवणुक करीत आहेत. पुणे ते नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर प्रवासासाठी 4000पेक्षा अधिक तिकीट आकारणी केली जात आहे. तर अशा व्यावसायिकांवर तत्काळ कारवाईचे निर्देश परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना दिले असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
राज्यात पिंपरी चिंचवड, पुणे येथे प्रत्येकी एक तर मुंबई येथे दोन, असे चार नवे रुग्ण आढळल्याने कोरोना रुग्णांची संख्या 52 झाली आहे. रुग्णालयातील कोरोनाच्या 41 जणांची प्रकृती उत्तम असून, 8 जणांना सौम्य लक्षणे आहेत. कस्तुरबा रुग्णालयातील दोघांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.