मुंबई - राज्यभरातील खासगी दवाखाने आता केवळ तीन तासच उघडे राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत. असे असले तरी रुग्णसेवा महत्त्वाची असल्याचे म्हणत इंडियन मेडिकल असोसिएशनने खासगी दवाखाने, क्लिनिक तीन तास रुग्णसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान ६५ वर्षांवरील आणि मधुमेह तसेच इतर आजार असलेल्या खासगी डॉक्टरांचे दवाखाने मात्र बंद राहणार आहेत.
कोरोनाच्या भीतीने मुंबईसह राज्यभरातील खासगी दवाखाने बंद आहेत. पण, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार डॉक्टरांना पीपीई किट, 95 मास्क आणि सॅनिटायझर्स मिळत नसल्याने तसेच इतर कारणांमुळे दवाखाने बंद आहेत. त्याचवेळी आपत्कालीन परिस्थितीत दवाखाने बंद असल्याने राज्य सरकारने दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यावरून सरकार आणि आयएमएमध्ये जुंपली आहे. अशात आता आयएमएने दिवसातून तीन तास खासगी दवाखाने-क्लिनिक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
डॉक्टरांनी आपल्या सोयीनुसार दिवसातून कुठल्याही वेळेत तीन तास दवाखाने-क्लिनिक सुरू ठेवावेत, अशा सूचना डॉक्टरांना करण्यात आल्या आहेत. तर सरकारकडून बंद दवाखान्याविरोधात कारवाई होत असल्याने दवाखान्याच्या दर्शनी भागात वेळ दर्शवणाऱ्या नोटिसा लावा, अशाही सूचना केल्या आहेत. खासगी दवाखाने बंद असल्याने सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. आता तीन तास दवाखाने सुरू राहणार असल्याने सर्वसामान्य रुग्णांना थोडाफार दिलासा मिळणार आहे.