लोणावळा : कोरोना विषाणूने सध्या जगभर धुमाकूळ घेतला आहे. प्रत्येक जण या संसर्गजन्य विषाणूची लागण होऊ नये यासाठी काळजी घेतोय. मात्र तरी देखील सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणहुन अफवा किंवा भीती पसरवण्याचा प्रकार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना संदर्भात अचूक माहिती देणारे किट लोणावळ्यातील मायलॅब डिसकव्हर सोल्युशन प्रा. लिमिटेड कंपनीने तयार केले आहे. या किटला ड्रग्ज कंट्रोल आँफ इंडियाने मान्यता दिली आहे. जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना मायलॅब सोल्युशन कंपनीने बनविलेले सदरचे किट भारतामध्ये कोरोना संसर्गाची माहिती मिळविण्याकरिता उपयुक्त ठरणार आहे.
या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ, कार्यकारी संचालक शैलेंद्र कवाडे व वितरण विभागाचे प्रमुख राहूल पाटील म्हणाले जगभरातील नऊ कंपन्यांना सदरचे किट बनविण्याची मान्यता आहे. मायलॅब ही भारतामधील एकमेव कंपनी आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) च्या नियमांप्रमाणे विविध पातळ्यांवर तपासणी करुन सदरचे किट बनविण्यात आले आहे. नांगरगाव औद्यागिक वसाहतीमधील मायलॅब मध्ये मागील सात ते आठ वर्षापासून विविध किट बनविण्यात येत असल्याने सदरचे किट बनविण्यात फार काळ लागला नाही. आठ ते दहा दिवसात हे किट बनविण्यात आले. या किटला ड्रग्ज कंट्रोल आँफ इंडियाची मान्यता मिळाली आहे. सध्या दिवसाला दहा हजार किट बनविले जात आहेत. कामाची क्षमता वाढवून दिवसाला 25 हजार किट बनविण्याचा आमचा मानस आहे. जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी संयशित व्यक्तीची तपासणी या किटच्या माध्यमातून करण्यात येईल. या किटमुळे संबंधित व्यक्तीला कोरोना झाला आहे का, साधा व्हायरल फ्लू आहे का याची माहिती समजणार असल्याने ते प्रभावी ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध असलेल्या किटच्या तुलनेत सदर किटची किंमत देखील कमी असून सुरुवातीच्या काळात केवळ भारत सरकारच्या आरोग्य विभागालाच हे किट पुरविण्यात येणार आहे. जगभरात कोरोनाने कहर केलेला असताना लोणावळ्यातील रावळ बंधू यांनी बनविलेले किट सध्या चर्चेचा विषय बनला असून मुलाने केलेल्या किमयाचे आज त्यांच्या मातोश्री पार्वती रावळ यांनी औक्षण करुन कौतुक केले.