आज राज्यात आणखी एका कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४२ झाली आहे. पुण्यातील ही ३२ वर्षीय महिला नेदरलँड वरुन दुबई मार्गे पुण्यात आलेली आहे.
आज ५८ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण १२२७ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ९५८ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ८६५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १२२७ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.