मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या राज्याला थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यभरात कंटेनमेंट कृती आराखड्याची कठोर अंमलबजावणी होत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांचा दुपटीच्या दराचा वेग कमी झाला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीचा वेग आधी दोन दिवस होता. यानंतर काही दिवसांनी तो साडेतीन दिवस असा झाला होता. मात्र आता साडेतीन वरुन रुग्णांच्या दुपटीचा वेग साडेपाच दिवसावर आला आहे. त्यामुळे दुपटीचा वेगाचा कालावधी जितका वाढत जाईल तेवढी रुग्णांची संख्या कमी होणार आहे.
देशभरामधून महाराष्ट्राचा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. यामध्ये 83 टक्के मृत्यू हे रुग्णाला पुर्वीपासून जडलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारखे आजार असल्याचे समोर आले होते. त्यामुळे कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीद्वारे राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णासाठ तातडीचा वैदयकीय सल्ला दिला जाणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाबाधितांच्या संख्या तीन हजारांच्या पुढे गेली. तीन हजारापेक्षा जास्त रुग्ण असणारं महाराष्ट्र पहिलंच राज्य ठरलं आहे. सोबतच मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे. गुरुवारी मुंबईत १७७ नव्या रुग्णांची भर पडली. राज्य सरकारने कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याचं प्रमाण कमी झालं असून रुग्ण उपचार घेऊन बरे होण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं सांगितलं आहे.