राज्यात कोरोनाने कहर मांडला आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ५०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. दरम्यान राज्य सरकारने सहा राज्यांना अति संवेदनशील घोषित केले असून या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटी पीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. (Maharashtra govt declares Kerala, Goa, Rajasthan, Gujarat, Delhi-NCR, & Uttarakhand as 'Places of Sensitive Origin' of Corona Virus)
महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना त्या आधी ४८ तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा रिपोर्ट प्रवाशांना राज्यात प्रवेश करताना किंवा रेल्वेस्थानकावर आल्यावर दाखवावा लागणार आहे.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आले असले तरी सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ४५ हजार ६५४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. तर गेल्या चोवीस तासांत ५०३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
राज्यात सध्या ६ लाख ७० हजार ३८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत ३१ लाख ६ हजार ८२८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६० हजार ४७३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतही गेल्या चोवीस तासांमध्ये ८ हजार ४७९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८ हजार ०७८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत ४ लाख ७८ हजार ०३९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा ८२ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा दरही ४५ दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या ८७ हजार ६९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.