मुंबई – राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला. या लॉकडाऊनमुळे देशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार आणि आस्थापनं ठप्प आहेत. अशामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे.
राज्यात ६ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. २० एप्रिलपासून राज्यातील काही भागात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून अर्थचक्र पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. अनेक कामकाज ठप्प पडल्याने राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठ्या प्रमाणात ताण पडला आहे. राज्यातील महसूलात घट होत असल्याचं दिसून येतं. यासाठी दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही सूचना केल्या होत्या.
यात राज्यात अनेक छोटी हॉटेल्स आहेत, पोळी-भाजी केंद्रं आहेत. खानावळी आहेत. जिथे अगदी माफक दरात 'राईसप्लेट' मिळते अशा हॉटेल्सची, खानावळींची किचन्स सुरु होणं गरजेचं आहे. त्याचसोबत जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान 'वाईन शॉप्स' सुरु करून, राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे असं सांगत दारू पिणाऱ्यांचा नाही तर राज्यातील घटत्या महसूलाचा विचार करावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती.
राज ठाकरेंच्या वाईन्स शॉप सुरु करण्याच्या मागणीवर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेड यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. राज्यातील जनतेसाठी स्वतःच्या खिशात हात घालावा. प्रमुख सेवांकडे दुर्लक्ष करून दारूची आठवण होते हे चुकीचे व संशयास्पद आहे, कदाचित बऱ्याच नेत्यांचा स्टॉक संपला असावा अशी शंका येते. कारण सत्तेत नसताना आणि फक्त एक आमदार असताना नागरिकांची काळजी करायची सोडून ‘दारू दुकानदारांची, बार मालकांची व दारू कंपन्यांच्या उद्योगपती मालकांची काळजी करणे सध्या गैर आहे. याउलट महाराष्ट्रात दारूबंदी झाली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली.
संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे शेतकरी, हातावर पोट असणारे कामगार, छोटे व्यावसायिक प्रचंड अडचणीत आहेत. या काळात अनेक लोकांना खायला अन्न मिळत नाही. त्याची काळजी केली नाहीतर भूकबळी वाढतील. संघर्ष काळात दिवसरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार यांना सुरक्षेसाठी आरोग्य किट मिळणे अपेक्षित आहे. गावोगावी त्याचा पुरवठा व्हायला हवा. त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी काळजी घेतली पाहिजे असं ते म्हणाले.