मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती बिकट होत चालल्यामुळे कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स मिळवताना रुग्णांच्या नातेवाइकांची दमछाक होताना पाहायला मिळत आहे. मात्र, महाराष्ट्रात लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं म्हणत संजय राऊत यांनी कौतुक केले आहे. (sanjay raut support cm uddhav thackeray over handling corona situation in maharashtra)
संजय राऊत बुधवारी पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील कोरोना लसीकरणावर राऊत यांनी भाष्य केले. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्रे हातात घेतली. त्यामुळेच आता मुंबईसारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर आली आहे. मुख्यमंत्री ज्याप्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत, त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल, असे राऊत म्हणाले.
खासदारांचा १९६ कोटींचा निधी केंद्राकडे पडून; अमोल कोल्हेंचे पंतप्रधान मोदींना पत्र
देशाने आता महाराष्ट्राचे अनुकरण करावे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २४ तास काम करत आहेत. कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो. उद्धव ठाकरे यांनीही एकाच ठिकाणी बसून अगदी गावपातळीपर्यंत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहिले. आता दिल्ली आणि संपूर्ण देशालाही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल. विरोधकांनी आता टीका करणे बंद करावे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रात उत्तम सूचना
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले होते. या पत्रातील अनेक सूचना उत्तम आहेत. राज्य सरकार त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल. राज्य सरकार आणि प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती ताकद लावून काम करत आहे, असे राऊत यांनी सांगितले.
मोफत लसीकरणासाठी BMC च्या एफडी मोडा; शिवसेना खासदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र
देशातील स्थिती गंभीर आहे
कोरोना संकटामुळे देश २० वर्षे मागे गेला आहे. देशातील स्थिती गंभीर आहे, काही राज्यांनी सुरुवातीपासून चाचण्या केल्या नाहीत . अचानक लाटा उसल्यामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथून आकडेवारी यायला लागली आहे. देशातील अनेक व्यवस्था कोलमडून पडल्या असून आता अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे राऊत यांनी म्हटले आहे.